Mon, Jun 24, 2019 21:14होमपेज › Nashik › अधिकार्‍यांना कळेना अन् सत्ताधारी पडले बुचकळ्यात

अधिकार्‍यांना कळेना अन् सत्ताधारी पडले बुचकळ्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे छायाचित्र अंदाजपत्रकात प्रसिद्ध करण्यावरून बुधवारी (दि.28) सत्ताधार्‍यांमध्ये गोंधळ उडाला. सत्तारूढ पक्षातीलच एका नगरसेवकाने यासंदर्भात ऐनवेळी पत्र दिले. तोपर्यंत अंदाजपत्रक छपाईसाठी रवाना होऊन काही प्रती छापल्यादेखील गेल्या होत्या. परंतु, विषय नाजूक असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी हे प्रशासनातील अधिकार्‍यांना कळेना आणि पदाधिकारीही बुचकळ्यात पडले. 

स्थायी समितीने 115 कोटींची वाढ सुचवित प्रशासनाचे अंदाजपत्रक महासभेकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. येत्या 31 मार्च रोजी अंदाजपत्रकासाठी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. यामुळे अंदाजपत्रकाच्या प्रतींची छपाई व त्याची जुळवाजुळव तसेच छपाई झाल्यानंतर नगरसेवकांना त्याचा अभ्यास करण्यासाठी वाटप करणे अशी सगळी लगीनघाई सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. महासभेकडे अंदाजपत्रक सादर केल्यामुळे अंदाजपत्रकातील छायाचित्रांचेदेखील नियोजन सुरू होते. त्यात अंदाजपत्रकातील पदाधिकारी व नगरसेवक वगळता कोणत्याही प्रकारची इतर छायाचित्रे वापरू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असता त्यास महापौरांसह सर्वच पदाधिकार्‍यांनी विरोध केला.

या वादावर पडत नाही तोच सत्तारूढ पक्षातील नगरसेवक योगेश हिरे यांनी अंदाजपत्रकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्राचा समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र नगरसचिव कार्यालयास सादर केले. तेथून हे पत्र लेखा व वित्त विभागाला सादर करण्यात आले. कारण याच विभागाकडून छपाईचे कामकाज चालते. हिरे यांच्या पत्रामुळे नेमका तत्काळ काय निर्णय घ्यावा, असा प्रश्‍न लेखा विभागाला पडला. यामुळे त्यांनी अंदाजपत्रक वाटपाचे काम बंद करण्याची सूचना केली. ही माहिती पदाधिकार्‍यांनाही ठाऊक नव्हती. याची चर्चा नंतर हळूहळू सर्वत्र पसरल्याने पदाधिकारीही बुचकळ्यात पडले. खरे तर अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वी दोन ते तीन दिवस ते अभ्यासासाठी नगरसेवकांच्या हाती पडणे गरजेचे असते. परंतु, आता लागोपाठ तीन सुट्ट्या आल्याने महासभेच्या दिवशीच ते नगरसेवकांना प्राप्त होणार आहे.

नगरसेवक हिरे यांच्याकडून मिळालेल्या पत्राची दखल घेतली जाईल. लेखा विभागाच्या माहितीप्रमाणे अंदाजपत्रकाची छपाई करण्यात आली आहे. परंतु, महासभेनंतर अंदाजपत्रकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात येईल.    - संभाजी मोरुस्कर, गटनेते, भाजपा 

नगरसेवक योगेश हिरे यांचे पत्र 26 ला नगरसचिव कार्यालयाला मिळाले. त्यानंतर ते दुसर्‍या दिवशी लेखा विभागाला प्राप्त झाले. परंतु, तोपर्यंत छपाईचे काम सुरू झाले होते. - सुभाष भोर, मुख्य लेखाअधिकारी 

स्थायी समितीकडून ठराव तत्काळ नगरसचिव कार्यालयास सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाविषयी कोणतीही माहिती नव्हती. त्याबाबतची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची आहे. महासभेनंतर छायाचित्र समाविष्ट करण्याबाबत सूचना केल्या जातील.  - दिनकर पाटील, सभागृहनेते, भाजपा 

 

Tags : nashik, nashik news, nashik municipal corporation, Vinayak Savarkar, photo, budget,


  •