Tue, Jun 25, 2019 16:03होमपेज › Nashik › मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ

मुक्‍त विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:12AM
नाशिक : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेल्या एमबीएच्या परीक्षेत दुसर्‍या दिवशी मार्केटिंगच्या विद्यार्थ्यांना ‘इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅण्ड इंटरनॅशनल ट्रेड’ विषयाचा पेपर असताना दुसर्‍याच विषयाची प्रश्‍नपत्रिका हाती पडल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. प्रश्‍नपत्रिकेवरील विषयाचा कोडनंबर बरोबर असला तरी प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न आपल्या विषयाशी संबंधित नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पेपर न सोडविण्याची भूमिका घेतली. अखेर विद्यापीठाकडून खात्री केल्यानंतर ही प्रश्‍नपत्रिकाच चुकीची असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर परीक्षा विभागाकडून नवीन पेपर पाठवून देण्यात आला. त्यामुळे तब्बल तासभरानंतर पेपरला सुरूवात झाली. या प्रकारामुळे मुक्त विद्यापीठाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत असलेल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (तिसरी सेमिस्टर) राज्यभरातील विविध केंद्रांवर सुरू असून, शुक्रवारी (दि.11) मार्केटिंग स्पेशल असलेल्या विद्यार्थ्यांचा ‘इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅण्ड इंटरनॅशनल ट्रेड’ हा पेपर दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत होता. त्यासाठी येथील केटीएचएम महाविद्यालय केंद्रावर सुमारे 25 विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका व उत्तर पत्रिकांचे वाटप करण्यात आले. मात्र, प्रश्‍नपत्रिका पाहिल्यानंतर त्यात असलेले प्रश्‍न आपल्या विषयाशी संबंधित नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत पर्यवेक्षकांकडे तक्रार केली. तसेच, हा पेपर सोडविणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर परीक्षा केंद्रावरून हा पेपर विद्यापीठाकडे पाठविण्यात आला असता पेपरच चुकीचा छापला गेल्याची बाब लक्षात आली.

त्यामुळे विद्यापीठाकडून सुमारे तासाभरानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नवीन पेपर पाठवून देण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पर्यवेक्षकांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढल्याने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला. या सगळ्या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कुलगुरू ई. वायुनंदन नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, हा प्रकार किती केंद्रावर, राज्यातइतर कुठल्या केंद्रावर घडला का याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रशासकीयस्तरावर कोणीही बोलण्यास तयार नसल्याने विद्यापीठाची याविषयी भूमिका कळू शकली नाही.

अडीचचा पेपर साडेतीनला सुरू 

परीक्षेची वेळ अडीच वाजेची असल्याने विद्यार्थ्यांना पेपर वेळेत हातात पडला. मात्र, पेपर चुकीचा छापून आल्याचे कळल्यानंतर तासाभरानंतर नवीन पेपर मागविण्यात आले. त्यामुळे साडेतीन वाजता पेपर सुरु झाला.  

कुलगुरू ई. वायुनंदन नॉट रिचेबल

एमबीए परीक्षेचा पेपर चुकीचा आल्याने या प्रकरणी विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन नॉटरिचेबल असल्याने त्याची प्रतिक्रिया कळू शकली नाही.