Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Nashik › भाजपा नगरसेवकांत युतीसंदर्भात संभ्रम

भाजपा नगरसेवकांत युतीसंदर्भात संभ्रम

Published On: May 12 2018 1:32AM | Last Updated: May 12 2018 1:32AMनाशिक : प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाच्या युतीविषयी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वक्‍तव्य केल्याने भाजपाच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण युतीसंदर्भात अद्यापही पक्षाकडून ठोस असे पत्र वा सांगावा न मिळाल्याने नेमके काय करायचे असा प्रश्‍न पडला आहे. यामुळे नाशिक मनपातील भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी भ्रमणध्वनीवरून आपल्या नगरसेवकांना सावधानतेचा इशारा देत दोन दिवस प्रतीक्षा करा, असा सल्ला दिला आहे. 

नाशिकसह पाच ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक येत्या 21 मे रोजी होत आहे. या सहा जागांपैकी तीन जागा शिवसेना व तीन जागी भाजपाने उमेदवार उभे केलेले आहे. परंतु, अद्यापही दोन्ही पक्षांकडून युतीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे नेमके करायचे काय असा प्रश्‍न भाजपाच्या नगरसेवकांना पडला आहे. त्यात मालेगाव येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीच्या फॉर्म्युल्याचे सूत्र सांगून नाशिकमधील अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांना भाजपाचा पाठिंबा नाही, असे जाहीर केले. यामुळे नगरसेवकांमधील संभ्रमात आणखी वाढ झाली आहे. कारण परवेझ कोकणी हे अपक्ष उमेदवार असले तरी ते भाजपाचेच उमेदवार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मनपातील भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी दानवे यांच्या वक्‍तव्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे यासंदर्भात विचारणा केली. तसेच अनेक नगरसेवकांनी पदाधिकार्‍यांना दूरध्वनी करून युतीविषयी माहिती घेतली असता पक्षश्रेष्ठींनी दोन दिवस प्रतीक्षा करा असे सांगत संयम बाळगण्याविषयी सांगितल्याचा निरोप भ्रमणध्वनीवरून पाठविला आहे.