होमपेज › Nashik › नाशिक अमरधाममधील विद्युतदाहिनीचे काम पूर्ण 

नाशिक अमरधाममधील विद्युतदाहिनीचे काम पूर्ण 

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:49PMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नाशिक अमरधाममध्ये साकारण्यात आलेल्या विद्युतदाहिनीचे काम पूर्ण झाले असून, दाहिनी आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली जुनी डिझेलदाहिनी पंचवटी अमरधाममध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, डिझेलऐवजी या दाहिनीसाठी गॅसचा वापर केला जाणार आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नाशिक अमरधाममधील डिझेलदाहिनी बंद आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी एकूण 12 बेड आहेत. परंतु, अनेकदा अंत्यसंस्कारासाठी मृतदेह जास्त प्रमाणात येत असल्याने असलेले बेड अपूर्ण पडतात. त्यामुळे बराच कालावधीसाठी नातेवाइकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ येते. या बाबत दै. पुढारीने दि. 9 ऑगस्ट रोजी सचित्र  वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर प्रशासनाने दखल घेत हा प्रश्‍न मार्गी लावला आहे.

डिझेलदाहिनीमुळे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, ही दाहिनीही सद्यस्थितीत बंद आहे. या दाहिनीला पर्याय म्हणून स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने विद्युतदाहिनी बसविण्याचे काम हाती घेतले. गेल्या सहा-सात महिन्यांपासून या दाहिनीचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, आता हे कामही पूर्ण झाल्याने आता ही दाहिनी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. एका दिवसाला 18 ते 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार या विद्युतदाहिनीच्या माध्यमातून होऊ शकतात. एक मृतदेह जळण्यासाठी 10 ते 25 मिनिटे इतका कालावधी लागतो. नाशिक अमरधाममध्ये असलेली डिझेलदाहिनी पंचवटी अमरधाममध्ये स्थलांतरित केली जाणार आहे. कारण या ठिकाणीदेखील गैरसोय होत असते. त्या अनुषंगाने मनपा बांधकाम विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर डिझेलदाहिनी अनेकदा बंद पडत असल्याने डिझेलऐवजी गॅसचा वापर केला जाणार आहे. डिझेलदाहिनी बंद पडल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी नाशिक शहरात व्यवस्था नाही.