Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Nashik › 'त्या' स्मशानभूमीमुळे विद्यार्थींचा कोंडमारा

'त्या' स्मशानभूमीमुळे विद्यार्थींचा कोंडमारा

Published On: Apr 22 2018 1:16PM | Last Updated: Apr 22 2018 1:16PMकळवण (नाशिक) : प्रतिनिधी 

तालुक्यातील भेंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील वादग्रस्त स्मशानभूमीचा वापर तात्पुरता बंद करण्याच्या आदेशाला ग्रामप्रशासनाने केराची टोपली दाखवली. कळवणचे उपविभागीय अधिकारी अमन मित्तल यांनी स्मशानभूमाचा वापर न करण्याचे आदेश दिले होते. पण,  ग्रामपंचायत व्यवस्थापनाने ही माहिती गावकऱ्यांना न  देता आदेशाकडे दुर्लक्ष केले. गावकऱ्यांनी २९ मार्चला स्मशानभूमीचा वापर केला असल्याचा आरोप रोहन सोनवणे यांनी केला आहे. तसेच भेंडी येथील जिल्हा परिषदेच्या पश्चिमेला नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात सोनवणे यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी , गटशिक्षण अधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. 

सोनवणे यांनी तक्रारीत म्हटले होते की, भेंडी येथे नव्याने बांधण्यात आलेली स्मशानभूमी ही शाळेच्या पश्चिमेस जवळचा बांधण्यात आली  आहे. दिवसा अंत्यविधी असल्यास जळणाऱ्या प्रेताचा उग्र वास व धूर शाळेत येतो. ज्या दिवशी अंत्यविधी असतो. त्यादिवशी शाळेत परिपाठ व प्रार्थना होत नाही, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खेळ्ण्यासाठी सोडले जात नाही. तसेच प्रेत यात्रा स्मशानभूमीकडे जात असताना शाळेच्या गेट समोरच खांदे पालटसाठी विसावा घेतला जातो. ही सगळी प्रक्रिया पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसमोर होत असल्याने त्यांच्या बाल मनावर विपरीत  परिणाम होतो. संपूर्ण अंत्यविधी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमध्ये बंद करून ठेवले जाते. हा प्रसंग बघणारे विद्यार्थी  लहान मुले रात्री झोपेत घाबरतात.

या विद्यार्थ्यांच्या १२ पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली होती. पण  त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. उलट काही धनधांडग्यांकडून आदिवासी पालकांचा तक्रारी बाबत  दमदाटी झाल्याचे समजते. यासर्वबाबींचा विचार करून  कळवणचे  उपविभागीय अधिकारी अमन मित्तल यांनी २३ मार्च २०१८  रोजी या स्मशानभूमीचा तात्पुरता वापर बंद करण्याचा आदेश पंचायत समिती व ग्रामपंचायतीला दिला होता. असे असताना दि २९ मार्च रोजी गावात एका व्यक्तीचे निधन झाल्याने या स्मशानभूमीचा अंत्यविधीसाठी पुन्हा वापर करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायतीने गावात  कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाची माहिती न देता थेट आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे. आदेशाचे पायमल्ली करणारयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहन सोनवणे यांनी केली आहे. 

Tags :  Cremation Ground, School, Nashik, Bhedi Village