Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Nashik › आमदार सानप यांना दणका

आमदार सानप यांना दणका

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 31 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेत करवाढीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि सत्ताधारी भाजपामध्ये युद्ध रंगले आहे. भाजपाने आयुक्तांविरोधात दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावामागचे सूत्रधार समजले जाणारे भाजपा शहराध्यक्ष तथा आ. बाळासाहेब सानप यांना महापालिकेने नऊ लाख रुपये भरपाईची नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या इमारतीचा विनापरवाना व नियमबाह्य वापर करून ती आपल्या ताब्यात ठेवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेऊन ही नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि.31) आयुक्त मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन 50 टक्के दरवाढ कमी केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील अविश्‍वासास मान्य होईल, असे वाटत असतानाच महापालिका प्रशासनाकडूनही कडक नियमांचे पालन करत आमदार बाळासाहेब सानप अध्यक्ष असलेल्या संस्थेस दोन नोटिसा बजावल्या आहेत. यात संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक मित्रमंडळाला देण्यात आलेल्या नोटिसीनुसार श्रीकृष्णनगर परिसरातील वाघाडी नदीलगत आमदार निधीतून बांधलेल्या तीन मजली इमारतीविषयी तक्रार दाखल आहे. याठिकाणी आमदार बाळासाहेब सानप यांच्याशी संबंधित संस्थेचा 2001 पासून ताबा आहे. या ठिकाणी व्यायामशाळा, संपर्क कार्यालय तसेच, ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेशी असलेला नाममात्र भाडेदराचा करारनामा संपुष्टात आल्यानंतरही करार न करता तसेच महापालिकेने यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावूनही लक्ष न दिल्याने अधिकृत करार केल्याचा ठपका ठेवत संत ज्ञानेश्‍वर अभ्यासिकेसाठी वार्षिक भाडे 5 लाख 56 हजार रुपये तर अधिक 18 टक्के जीएसटी तर श्रीराम सार्वजनिक वाचनालय इमारतीच्या वापरासाठी 3 लाख 27 हजार रुपये अधिक जीसएसटी अशी सुमारे नऊ लाख रुपये रकमेची नोटीस पाठविण्यात आली आहे. याबाबत आमदार सानप यांच्याकडून याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. 

अविश्‍वास ठरावामागचे सूत्रधार

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपाने आणलेल्या अविश्‍वास ठरावामागे आ. सानप यांची भूमिका महत्वाची मानली जात असून, महापालिकेच्या पंचवटी विभागाच्या माध्यमातून आ. सानप यांना नऊ लाखांची नोटीस बजावण्यात आल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.