होमपेज › Nashik › बससेवेचा अहवाल आयुक्तांनी फेटाळला

बससेवेचा अहवाल आयुक्तांनी फेटाळला

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 15 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी

बससेवेसंदर्भात क्रिसील संस्थेने सादर केलेला अहवाल मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी फेटाळत नव्याने सुधारित वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या सहा महिन्यात नाशिक शहराची बससेवा मनपामार्फत सुरू झालेली नाशिककरांना पहावयास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

यासंदर्भात मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांना विचारले असता त्यांनी क्रिसीलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बससेवेच्या अहवालाविषयी चर्चा झाली असून, त्यांना सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. याआधी सादर करण्यात आलेल्या अहवालात केवळ बससेवेविषयी माहिती पुरविण्यात आली असून, ठोस असे पर्याय देण्यात आलेले नाहीत. नाशिक शहराला बससेवेची गरज आहे का, किती बसेसची गरज आहे, बससेवेचे मार्ग कोणते असतील, प्रवासी संख्या किती असेल, बसडेपो किती आवश्यक आहे, बसथांबे किती गरजेचे आहे, तिकीट दर काय असेल तसेच, बससेवा कोणी चालविल्यास फायदेशीर ठरू शकेल यांसह विविध स्वरूपाची माहिती अहवालात देण्यात आलेली नव्हती. यामुळे अहवालाशी आपण सहमत नसल्याचे क्रिसीलला कळविण्यात आल्याचे आयुक्‍त मुंढे यांनी सांगितले. मनपामार्फत बससेवा सुरू होत नाही तोपर्यंत एसटी महामंडळानेच बससेवा सुरू ठेवून प्रवाशांची सेवा करावी, असे मनपाकडून कळविले जाणार आहे. अद्याप महामंडळाबरोबर चर्चा झाली नसून, लवकरच हे आवाहन कळविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.