Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Nashik › आयुक्‍त मुंढेंनी महापौरांना दिले कायद्याचे धडे

आयुक्‍त मुंढेंनी महापौरांना दिले कायद्याचे धडे

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

अव्वाच्या सव्वा करण्यात आलेली घरपट्टी दरवाढ मागे घेत ती सुधारित मूल्यानुसार लागू करावी व शेतजमिनीवर कर आकारणी करू नये या मागणीसाठी महापौर रंजना भानसी व भाजपा पदाधिकार्‍यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची सोमवारी (दि.9) त्यांच्या दालनात भेट घेतली. मात्र, आयुक्तांनी ही दरवाढ कशी योग्य व नियमाला अनुसरून आहे हे पटवून देत कायद्याचे धडे महापौर व भाजपा शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे भेट घेण्यासाठी गेलेल्या पदाधिकार्‍यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

आयुक्त मुंढे यांनी महापालिकेच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी निवासी व अनिवासी घरपट्टीत दरवाढ केली होती. एवढ्यावरच न थांबता शहरातील मोकळे भूखंड, बंगल्यातील मोकळी जागा, इमारतींचे पार्किंग व सामासिक अंतरही यावरदेखील घरपट्टी आकारण्याचा निर्णय नवीन कररचनेत जाहीर केला. तसेच शहरातील शेतजमिनीवरही घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य व शहर हद्दीतील खेड्यातील लोकांमध्ये संतापाची लाट आहे. या करवाढीला सर्व पक्षांनी विरोध केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय गटनेते महासभेनंतर आयुक्तांची भेट घेणार होते. मात्र, महासभा गोंधळात आटोपल्यानंतर महापौर भानसी व भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. वाढीव घरपट्टी सुधारित दरानुसार लागू करावी. तसेच, शेतजमिनीवर या अगोदर कोणतीही कर आकारणी होत नव्हती, असे सांगत ही दरवाढ मागे घ्यावी. ले-आउट पडलेल्या जमिनीवर कर आकारा, पण शेतजमिनीवर नको, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले. 

आयुक्त मुंढे यांनी हे सगळे शांतपणे ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर त्यांनी महापौर व नगरसेवकांना कायद्याचे धडे दिले. ही जी दरवाढ करण्यात आली आहे ती नियमानुसार करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा नसून तो कसा कायद्याला धरून आहे व तशी तरतूद आहे, या बाबतचा कायदाच त्यांनी वाचून दाखवला. या सर्व प्रकारानंतर महापौर व भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन देत त्यांच्या दालनातून काढता पाय घेण्यातच हुशारी समजली. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह गटनेते संभाजी मोरुस्कर,  दिनकर आढाव, जगदीश पाटील, प्रशांत जाधव, मुकेश शहाणे आदी यावेळी उपस्थित होते.