Sun, Aug 18, 2019 21:37होमपेज › Nashik › आयुक्‍त अन् लोकप्रतिनिधींत शीतयुद्ध

आयुक्‍त अन् लोकप्रतिनिधींत शीतयुद्ध

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:09AMनाशिक : प्रतिनिधी

तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद तसा  नवीन नाहीच. यापूर्वी त्याची झलक पुणे, नवी मुंबई यासह अनेक ठिकाणी पहावयास मिळाली आहे. आता नाशिकमध्ये येऊन त्यांना अवघे 19 दिवस झाले नाही तोच मनपातील भाजपा पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात वादावादी सुरू झाली आहे. वाढीव घरपट्टीच्या ठरावावरून सुरू झालेला वाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्यास पक्षश्रेष्ठी आपल्या पदाधिकार्‍यांमार्फत नाशिककरांची बाजू घेणार की प्रशासनाची याकडे लक्ष लागून आहे. 

महापालिकेत रूजू होताच आयुक्‍तांनी अनेक निर्बंध लागू केल्याने उघड नाही परंतु, दबक्या आवाजात नगरसेवक आणि एकूणच पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी प्रकट केली जात आहे. अशीच स्थिती चालू राहिली तर खैर नाही अशीच धास्ती घेतल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मनपात पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही जवळपास पाय ठेवणे बंद केले आहे. यामुळे नेहमीच नगरसेवकांनी गजबजणारी मनपा सुनीसुनी दिसून येत आहे. गेल्या 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत वाढीव घरपट्टीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्याचे विपरित परिणाम आता भाजपाला भोगावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ही बाब साहजिकच सर्वांना खटकू लागल्याने पदाधिकार्‍यांकडून घरपट्टी कमी करण्याचा विचार सुरू आहे तर दुसरीकडे घरपट्टी प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाकडून पदाधिकार्‍यांकडे ठरावाची मागणी होऊ लागली आहे. त्यात विरोधी पक्ष आणि शहरातील महत्वाच्या सर्वच उद्योजक व व्यावसायिक संघटनांनीही वाढीव घरपट्टीला विरोध करत नाशिक बंदचा इशारा दिल्याने भाजपा कोंडीत सापडला आहे. जनआंदोलनाचा वाढता जोर आणि प्रशासनाकडून ठरावासाठी थेट वरिष्ठांची भीती दाखवून तगादा लावला जात असल्याने पदाधिकार्‍यांसमोर काय निर्णय घ्यावा, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. यावर शहरातील तिन्ही आमदार आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतर ठरावाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असा पवित्रा पदाधिकार्‍यांनी घेतल्याने प्रशासन आणि पदाधिकार्‍यांमध्ये रामायण सुरू झाले आहे.