Mon, Apr 22, 2019 06:18होमपेज › Nashik › मुंढेंसाठी नाशिककर उतरणार रस्त्यावर

मुंढेंसाठी नाशिककर उतरणार रस्त्यावर

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 28 2018 10:50PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सारे राजकीय पक्ष एकवटले असताना, आयुक्‍तांना पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी सामान्य नाशिककरांनी मात्र रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. मुंढे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाविरोधात येत्या शुक्रवारी (दि. 31) ‘वॉक फॉर कमिशन’ या नावाने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप ठेवत सत्ताधारी भाजपाने अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. येत्या शनिवारी (दि. 1) विशेष महासभेत या ठरावावर फैसला होणार आहे. भाजपाच्या या पवित्र्याला अन्य राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. एकीकडे मुंढेंविरोधात राजकीय पक्ष एकवटले असताना, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक मात्र मुंढेंच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र आहे. मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकारी शहराच्या विकासासाठी हवा असून, नगरसेवक व अधिकार्‍यांची भ्रष्ट कमाई बंद झाल्यानेच त्यांना हटविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले असल्याचा दावा केला जात आहे.

सोशल मीडियावरही या आशयाचे व पाठिंब्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंढे यांना समर्थन देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि. 28) सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. राजू देसले, हंसराज वडघुले, निशिकांत पगारे, समाधान भारती, योगेश कापसे, ज्योती नटराजन, राकेश पवार, स्वप्नील घिया, अभिजित गोसावी आदी यावेळी उपस्थित होते. मुंढे यांना पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी पुढील तीनही दिवस शहराच्या मध्यवर्ती भागांतील चौकांत एकत्र येऊन नागरिकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी किंवा शनिवारी (दि. 1) सकाळी ङ्गवॉक फॉर कमिशनरफ या नावाने मोर्चा काढण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.