Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Nashik › सिंहस्थ कामांची होणार तपासणी 

सिंहस्थ कामांची होणार तपासणी 

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 10 2018 11:31PMनाशिक : प्रतिनिधी

सिंहस्थ होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर शहरात आजही अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे संबंधित कामे तपासून त्या संदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. 

2015 मध्ये सिंहस्थ पार पडला. त्यासाठी विविध विकासकामे व प्रकल्पांचा आराखडा मनपाने तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मनपा, केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यातून सिंहस्थाची अनेक कामे उभी राहिली. त्यात प्रामुख्याने रिंगरोड, जलकुंभ, पाणीपुरवठा, गोदाघाट यासह विविध कामे करण्यात आली. आता सिंहस्थ होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, काही कामे अजूनही सुरूच आहेत. या कामांपोटी महापालिकेला 70 कोटींचा निधी संबंधित ठेकेदारांना अदा करायचा आहे. परंतु, अद्याप कामेच पूर्ण न झाल्याने ही बिले अदा करण्याचा प्रश्‍नच नाही.

दरम्यान, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतरही कामे का पूर्ण झाली नाही, त्यांची मुदत काय होती यासह विविध बाबींची माहिती खातेप्रमुखांनी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. त्या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांना पत्रही सादर केले आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी महापालिकेने शासनाच्या मंजुरीने हुडको आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून 320 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यापैकी 130 कोटी रुपयांचे कर्ज मनपाने उचलले असून, सध्या सुरू असलेल्या सिंहस्थाच्या कामांसाठी उर्वरित मंजूर कर्जातून आणखी कर्ज मनपा उलचणार आहे. परंतु, सुरू असलेल्या कामांची मुदत संपलेली असेल किंवा आवश्यकता नसेल तर अशी कामे रद्द करून कर्ज उचलण्याबाबतही फेरविचार करण्याची सूचना आयुक्‍त मुंढे यांनी केली आहे.