Fri, Aug 23, 2019 22:07होमपेज › Nashik › आ. कदम, पिंगळे, शरद आहेर यांनी घेतली भुजबळांची भेट 

आ. कदम, पिंगळे, शरद आहेर यांनी घेतली भुजबळांची भेट 

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:34AMनाशिक : प्रतिनिधी 

मनी लाँडरिंग व महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर पीएमएलए न्यायालयात बुधवारी (दि.17) सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे यांनी न्यायालय आवारात भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र, या भेटीमुळे  भुजबळांना सर्वपक्षीय समर्थन दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

छगन भुजबळ हे 22 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. भुजबळांनी जामिनासाठी केलेले सर्व अर्ज पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. बुधवारी (दि.17) न्यायालयाने पुन्हा एकदा अर्ज फेटाळला. त्यामुळे भुजबळ समर्थकांची निराशा झाली. त्यामुळे भुजबळांवर अन्याय होत असल्याची भावना बळावत आहे. राजकीय भिंती दूर सारून सर्व पक्षांतील नेते भुजबळांच्या समर्थनार्थ पुढे येत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. कधीकाळी भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले अद्वय हिरे यांनी न्यायालयात भुजबळांची भेट घेतली होती.

त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्या पाठोपाठ आता शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे सध्या शिवसेनेते असलेले बंधू गोकुळ पिंगळे, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी बुधवारी न्यायालय परिसरात भुजबळांची भेट घेतली.

पाच ते दहा मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नसले तरी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्‍त झाले आहे. भुजबळांवर अन्याय होत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाचे नेते सहभागी झाले होते. न्यायालयातील भेटीमुळे पुन्हा एकदा सर्वपक्षीय नेत्यांचे भुजबळप्रेम उघड झाल्याचे पाहायला मिळत आहे.