Fri, Jul 19, 2019 05:08होमपेज › Nashik › महाविद्यालयांच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची फरपट?

महाविद्यालयांच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची फरपट?

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

सध्या शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीने महाविद्यालये गजबजली आहेत. मात्र, या गजबजलेल्या गर्दीत विविध शैक्षणिक कागदपत्रे जमा करताना विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर फरपट होताना दिसत आहे. महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच इतर सुविधा सुरळीतपणे मिळाव्यात यासाठी कोणतेही विशेष नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे कामकाजही सरकारी कार्यालयांसारखे वेळखाऊ आणि आर्थिक भुर्दंड देणारे ठरत असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

दहावी-बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अकरावीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच इतर विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे जमा करताना वणवण भटकावे लागत आहे. सरकारी विभागांशी संबंधित उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर आदी कागदपत्रे थेट महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

मात्र, या योजना बहुतांशी महाविद्यालयांत सुरूच नाही, तर जिथे सुरू आहेत. तिथे विद्यार्थ्यांवर उपकार केल्यासारखी वागणूक सेवा केंद्रांकडून दिली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे ज्या बाबी महाविद्यालयांच्या अधीन आहेत. त्या तरी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्रासाविना देणे अपेक्षित असताना महाविद्यालयांकडूनही विद्यार्थ्यांचा बोनाफाइड, बस पाससाठी लागणारा शिक्का अशा किरकोळ बाबींसाठी फरपट होताना दिसत आहे. त्यामुळे किमान महाविद्यालयांनी तरी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.