Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Nashik › क्रांतिदिनाचे आंदोलन स्थगित करावे

क्रांतिदिनाचे आंदोलन स्थगित करावे

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:16AMनाशिक : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असून, सरकार आरक्षणाबद्दल कटिबद्ध आहे. त्यामुळे सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्टला क्रांतिदिनी पुकारण्यात आलेले चक्का जाम आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांना केली. तसेच याबाबतचा संदेश गावा-गावांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सकल मराठा समाजातर्फे गेल्या काही दिवसांत आरक्षणावरून राज्यभरात हिंसक घटना घडल्या आहेत. समाजातर्फे गुरुवारी (दि.9) राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ती पार्श्‍वभूमी लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी (दि.7) जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, करण गायकर, गणेश कदम, तुषार जाधव, तुषार गवळी आदी उपस्थित होते.  मराठा समाजातर्फे मागण्यांसंदर्भात यापूर्वी शांततेने मोर्चे काढले. मागण्या मान्य न झाल्याने विविध प्रकारचे आंदोलने केली जात आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रमाणात या आंदोलनांना वेगळे स्वरूप दिले जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. सरकार मागण्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी  सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. त्यामुळे 9 तारखेचे चक्का जाम आंदोलन मागे घेत जिल्ह्यात शांतता राखावी, अशी विनंती जिल्हाधिकार्‍यांनी पदाधिकार्‍यांना केली. 

मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडलेल्या घटना महाराष्ट्रासाठी भूषावह नसल्याचे खेडकर म्हणाले. मागण्यांबाबत संवादातून मार्ग काढणे शक्य असल्याचे सांगत त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी जनतेशी साधलेल्या संवादाची चित्रफीत यावेळी पदाधिकार्‍यांना दाखविण्यात आली. तसेच आंदोलन मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र तसेच मुख्यमंत्र्यांच्या संवादाची सीडी पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.