Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Nashik › जिल्ह्यातील ७०० संस्थांना बजाविणार नोटिसा

जिल्ह्यातील ७०० संस्थांना बजाविणार नोटिसा

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:37PMनाशिक : प्रतिनिधी

आर्थिक वर्ष संपल्यानंतरही लेखापरीक्षणाचा अहवाल सादर न करणार्‍या जिल्ह्यातील 708 सहकारी संस्थांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतरही अहवाल सादर करण्यास चालढकल केल्यास या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

31 मार्चला आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली जात असते. निधीप्रमाणेच लेखापरीक्षणही त्या-त्या वर्षात होणे आवश्यक आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांनी मात्र लेखापरीक्षणाकडे कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण 6943 सहकारी संस्था आहेत. यात विविध विकास सहकारी संस्था, नागरी सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. या सगळ्याच संस्थांनी लेखापरीक्षण करून घेणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी लेखा परीक्षक  नेमून त्यासाठी लागणारा खर्च या संस्थांनीच सोसणे आवश्यक आहे. 6235 संस्थांनी लेखा परीक्षक नेमून लेखापरीक्षण करून घेतले आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे एवढ्याच संस्थांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित 708 संस्थांचे अहवाल प्राप्त न झाल्याने या संस्थांचे लेखापरीक्षण झाले किंवा नाही, याविषयी शंका आहे. या सर्व संस्थांना आता नोटिसा देण्यात येणार असून, अहवाल करण्यासंदर्भात सूचित करण्यात येणार आहे. लेखापरीक्षण झाले असेल तर या संस्था अहवाल सादर करतील. त्यासाठी चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत संधी दिली जाणार आहे. दरम्यानच्या काळात ज्या संस्थांचे अहवाल प्राप्त होणार नाहीत, अशा संस्थांवर कलम 57/5 नुसार कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.