Wed, May 22, 2019 22:18होमपेज › Nashik › शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती

शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारातील शीतपेट्यांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने कामकाज खोळंबले आहे. शीतपेट्यांना हात लावल्यास शॉक लागत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.  वीजप्रवाह बंद केल्याने  बेवारस 24 मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. 

पावसाळी दिवसांत ठिकठिकाणी वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकार होत असतात. तर काही ठिकाणी वायरींमध्ये बिघाड झाल्याने किंवा इतर कारणांनी इतरत्र वीज प्रवाह उतरत असतो. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील शवागारातील शीतपेट्यांमध्ये वीजप्रवाह उतरल्याची बाब शनिवारी (दि.21) उघडकीस आली. रुग्णालयीन कर्मचारी एक मृतदेह शीतपेटीत ठेवण्यासाठी गेला असता स्ट्रेचरचा धक्का शीतपेटीला लागला. स्ट्रेचरला धरून उभ्या असलेल्या कर्मचार्‍यास त्याचवेळी विजेचा धक्‍का बसला आणि तो मागे फेकला गेला. त्यानंतर तेथे कोणीही जाण्यास धजावले नाही. वरिष्ठांना याबाबत तक्रार दिल्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अखेर सोमवारी (दि.23) या शीतपेट्यांमधील वीजप्रवाह बंद करण्यात आला आहे. या शीतपेट्यांमध्ये सद्यस्थितीत बेवारस 24 मृतदेह आहेत. वीजप्रवाह नेमका कोणत्या कारणामुळे शीतपेट्यांमध्ये उतरला आहे, याचा शोध  घेण्याची प्रशासनाकडून तसदी  घेतलेली नाही. वीजप्रवाह बंद केला असला तरी मृतदेह कुजण्याची  भीती वाढली आहे.