Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Nashik › पालिकांचा विकासाचा मार्ग मोकळा

पालिकांचा विकासाचा मार्ग मोकळा

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 18 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील नगरपंचायती व नगरपालिका कार्यक्षेत्रांमधील मूलभूत सुविधा, विशेष सहाय्य निधी, वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच मुद्रांक शुल्कापोटी कोट्यवधींचा निधी सरकारने 31 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. निधी प्राप्तीमुळे नगरपालिका व नगरपंचायतींमधील विकासाला चालना मिळणार आहे. 

विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वारंवार केली जाते. अनेकदा निधी न मिळाल्याचे खापर स्थानिक पदाधिकार्‍यांकडून राज्य सरकारवर फोडले जाते. जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या निफाड, कळवण, देवळा, पेठ, सुरगाणा व पेठ नगरपंचायतींसाठी सरकार निधी देत नसल्याची ओरड होती. त्यामुळे विकासकामे करायची कशी अशा पेचात स्थानिक पदाधिकारी सापडले होते. मात्र, राज्य सरकारने ही अडचण दूर केली आहे. सरकारने या सर्व नगरपंचायतींना प्रत्येकी 25 लाखांचा निधी दिला आहे.

चांदवड नगरपंचायतीसाठी सहाय्य अनुदानांंतर्गत 50 लाखांचा निधी देण्यात आला असतानाच निफाड व पेठसाठी अनुक्रमे तीन व एक कोटींचा निधी सरकारने दिला आहे. नागरी सुुविधांमध्ये कळवण व देवळा प्रत्येकी दोन कोटींचा तर चांदवड नगरपंचायतीस तीन कोटींचा निधी सरकारने प्रशासनाकडे वर्ग केला आहे. या निधीतून नगरपंचायत क्षेत्रात रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधा उभारण्यास वाव मिळाला आहे. जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या सिन्नरलाहद्दवाढ व वैशिष्ट्यपूर्ण योजनांसाठी एकूण दोन कोटी 65 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

Tags : Nashik, Clear, path, development,  corporation