Fri, Apr 26, 2019 15:31होमपेज › Nashik › शहर सुधार समितीनंतर विधी सभेलाही अधिकार्‍यांची दांडी

शहर सुधार समितीनंतर विधी सभेलाही अधिकार्‍यांची दांडी

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:59PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शहर सुधारणा समितीबरोबरच मनपाच्या विधी समितीच्या सभेलाही मनपा प्रशासनातील अधिकार्‍यांनी दांडी मारल्याने या समितीच्या सभा केवळ आता नावालाच उरल्यात जमा झाल्या आहेत. प्रशासन व नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने तसेच विचारलेली माहिती सादर न केल्याने मनसेचे गटनेते तथा विधी समितीचे सदस्य सलिम शेख यांनी संतप्‍त होत सभात्याग केला. 

भाजपाने महापालिकेत बहुमत प्राप्‍त करताच मनपात तीन समित्यांची नव्याने भर घालून आपल्या नगरसेवकांना सभापती व उपसभापतिपदाची खुर्ची बहाल केली. त्यातून अनेकांची सभापती होण्याची सोय झाली असली तरी अद्यापही या समित्यांचे अधिकार काय आणि त्यात कोणते विषय यावे तसेच विकासकामांचे विषय मंजुरीसाठी यावेत की नाही याबाबत खल सुरू आहे. यामुळे अजूनही शहर सुधारणा समिती, आरोग्य समिती आणि विधी समिती केवळ नावालाच असल्याचे चित्र दिसत आहे. 

भाजपाने मोठ्या दिमाखाने या समित्यांची रचना केली. परंतु, आता याच समितीच्या सभांची शोभा वाढल्याने समितीच्या सभांकडे सदस्यही पाठ फिरवू लागले आहेत. शनिवारी (दि.2) सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला नऊपैकी शरद मोरे, पूनम मोगरे, नयना गांगुर्डे, सलिम शेख हे चारच सदस्य हजर होते. इतर चार सदस्य गैरहजर राहिले. तर दुसरीकडे प्रशासन आणि नगररचना विभागाचे अधिकारीही सभेला हजर राहिले नाही. यामुळे विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे सदस्यांना मिळू शकली नाहीत. 

मनपातील अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करण्यासाठी समितीवर कोणत्या अधिकार्‍यांची नेमणूक केली आहेे व त्यावर कुणाचे नियंत्रण आहे तसेच चौकशी करून किती अधिकारी व कर्मचार्‍यांना कामावर घेण्यात आले याची माहिती सलिम शेख यांनी मागितली. मात्र, अधिकारीच उपस्थित नसल्याने त्यांना ही माहिती मिळाली नाही. यामुळे संतप्‍त होत त्यांनी सभात्याग करून संबंधित अधिकार्‍यांचा निषेध नोंदविला. नगररचना विभागाशी संबंधित न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांची माहिती सभापती माळोदे यांनी मागितली. मात्र, प्रत्येक खातेनिहाय अहवाल न आल्याने तो पुढील सभेत सादर करण्यास विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांना आदेशित करण्यात आले.