होमपेज › Nashik › नदीकाठच्या नागरिकांना मनपाकडून मिळणार धोक्याचा इशारा

नदीकाठच्या नागरिकांना मनपाकडून मिळणार धोक्याचा इशारा

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:32AMनाशिक : प्रतिनिधी

पावसाळ्यात पूर आणि अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका वाटल्यास अशा स्थितीत महापालिका शहरात ठिकठिकाणी अलर्ट देऊन रहिवाशांना सावध करणार आहे. याबाबतच्या सूचना सहाही विभागीय अधिकारी आणि अग्‍निशमन विभागाला देण्यात आल्या आहेत. 

महापालिकेच्या बांधकाम विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून नागरिकांना पावसाळ्यात विविध सेवा देण्यासाठी त्या त्या विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांचा त्यात समावेश केला आहे. पावसाळ्यात पाणी साचून आपत्ती निर्माण होणारी ठिकाणे, अतिसंवेदनशील परिसर यासह विविध माहिती मनपाने तयार करून उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तसेच, गोदावरीसह नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी नदीकाठी राहणार्‍या रहिवाशांना नेहमीच महापुराच्या संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकदा महापुरात नुकसान झाल्यानंतर महापूर नैसर्गिक होता की मानवनिर्मित हे शोधण्यातच काथ्यकूट केला जातो. त्यावर नंतर कोणतीही कार्यवाही होत नाही. यामुळे आता महापूर वा पूर येण्यापूर्वी तसेच, अतिवृष्टीचा धोका निर्माण होण्यापूर्वी महापालिकेकडून नदीकाठी राहणार्‍या नागरिकांना अलर्ट दिला जाणार आहे.

त्यासाठी सहाही विभागीय अधिकारी आणि अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी केवळ रामकुंड व परिसरातील व्यावसायिक आणि रहिवाशांना धोक्याचा इशारा दिला जायचा. आता इतर भागातील नागरिकांना देखील धोका कळविला जाणार आहे. मागील वर्षी आलेल्या आपत्तीमुळे मनपाने नदीकाठी राहणार्‍या नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेश पाठवून धोक्याचा इशारा देण्याचे ठरविले होते. परंतु, आता त्याऐवजी सायरन वाजवून आणि ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत.