होमपेज › Nashik › ‘डीबीटी’विरोधात आदिवासी आयुक्‍तालयाला घेराव

‘डीबीटी’विरोधात आदिवासी आयुक्‍तालयाला घेराव

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 28 2018 10:42PMनाशिक : प्रतिनिधी 

डीबीटी निर्णयाविरोधात मंगळवारी (दि.28) स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास आयुक्‍त कार्यालयावर धडक देत बेमुदत महाघेराव आणि महामुक्‍काम आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना न  जुमानता आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून मुख्य दालनात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी रोखून धरल्याने आंदोलनकर्त्यांनी आवारातच ठिय्या मांडला. 

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांच्या खानावळ बंद करून जेवणाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे वसतिगृह व्यवस्था मोडीत निघून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारा मासिक निर्वाह भत्ता 500 ते 800 रुपये आणि किरकोळ वार्षिक शिष्यवृत्ती वर्षानुवर्षे मिळत नाही. वसतिगृहात इतर शैक्षणिक साहित्यांसाठी सुरू असणारी थेट लाभाची योजना अपयशी ठरली आहे. ती रक्कम वेळेवर मिळत नाही. ही वस्तुस्थिती समोर असताना मासिक जेवणासाठी थेट रक्कम देऊन शासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप ‘एसएफआय’ने केला आहे. 

शासन निर्णयानुसार वसतिगृह प्रशासनाची विद्यार्थ्यांप्रति जबाबदारी संपणार आहे. वसतिगृह व्यवस्थाच मोडीत निघून आदिवासी विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर फेकले जातील. त्यामुळे डीबीटीचा निर्णय रद्द होईपर्यंत बेमुदत महाघेराव आणि महामुक्काम आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय एफएसआयने घेतला आहे. दरम्यान, ईदगाह मैदानावरून सुरू झालेला मोर्चा जलतरण तलाव सिग्नलमार्गे आदिवासी आयुक्तालयावर आला. यावेळी डॉ. अशोक ढवळे, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अनिकेत ठोंबरे, सुवर्णा गांगुर्डे, विजय पाटील आदी उपस्थित होते.   

तीन तासांच्या चर्चेनंतर अखेर आंदोलन मागे

तीन तासांच्या दिर्घ चर्चेनंतर अखेर सायंकाळी महाघेराव आंदोलन मागे घेण्यात आले. एसएफआयच्या शिष्टमंडळाने प्रभारी आदिवासी आयुक्‍त डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा केली. या शिष्टमंडळात बालाजी कलेटवाड, अजित नवले, सोमनाथ निर्मळ, अशोक ढवळे, कविता वारे आदी सहभागी झाले होते. 

येत्या शनिवारी (दि.1) दुपारी तीन वाजता आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या मंत्रालयातील दालनात सावरा यांच्यासह एसएफआयचे प्रतिनिधी, प्रधान सचिव, आदिवासी आयुक्‍त आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ‘डीबीटी’बाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्‍त करताना विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले. आदिवासी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एसएफआयच्या पदाधिकार्‍यांनी दिला.