Sun, May 26, 2019 19:41होमपेज › Nashik › नाशिक : ‘करी’ची कटकट नको म्हणून आटोपली सभा

नाशिक: ‘करी’ची कटकट नको म्हणून आटोपली सभा

Published On: Jan 16 2018 1:09PM | Last Updated: Jan 16 2018 1:57PM

बुकमार्क करा
सिडको : वार्ताहर

करीच्या दिवशी कटकट झाली तर वर्षभर कटकटीच होतील, असा समज बाळगत सोमवारची सिडको प्रभाग सभा अवघ्या पंधरा मिनिटातच संपवण्यात आली. महापालिकेच्या कारभार्‍यांमधील ही अंधश्रद्धा पाहून सिडकोमधील नगरसेवकांमध्येच संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. तर काही नगरसेवकांना समस्याच मांडता न आल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

सिडको कार्यालयात सोमवारी (दि.15) नेहमीप्रमाणे प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. सिडको विभागीय कार्यालयात दरमहा होणार्‍या या सभेत नगरसेवकांना समस्या मांडता येतात, नव्याने प्रभाग विकासासाठी मंजूर असलेल्या कामांचा आढावा घेता येतो. विविध मुद्यांवरून प्रभाग सभेत गदारोळ वा वादविवाद होतात. यावेळी अनेक नगरसेवकांसह काही अधिकारीदेखील असे म्हणत होते की, आज कर आहे, त्यामुळे आज करकर नको, आज कटकट झाली तर संपूर्ण वर्षच खराब जाईल. त्यामुळे ‘करी दिन’ असल्याचे कारण सांगून नियोजित प्रभाग सभा अवघ्या पंधरा मिनिटातच आटोपती घेण्यात आली. प्रशासकीय कामकाजातही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अंधश्रद्धा बाळगत असल्याचे पाहून अनेकांकडून संताप व्यक्‍त केला जात होता.

प्रभाग सभा आटोपती घेतल्यामुळे नगरसेविका सुवर्णा मटाले यांना प्रभागातील समस्याच मांडता न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. डीजीपीनगरातील वाढते अतिक्रमण आणि मद्यपींवर कार्यवाही करण्यासाठीचा मुद्दा त्या सभेत उपस्थित करणार होत्या. मात्र त्यांचे सर्वच प्रश्‍न प्रलंबित राहीले. त्यामुळे मटाले यांनी विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्याकडे तक्रार केली. इतर नगरसेवकांनीदेखील आपापल्या काही समस्या व स्वच्छता अभियानासंदर्भात प्रश्‍न मांडता न आल्याने नाराजी व्यक्‍त केली.

यावेळी सभापती सुदाम ढेमसे, नगरसेवक मुकेश शहाणे, हर्षा बडगुजर, भाग्यश्री ढोमसे, श्याम साबळे, निलेश ठाकरे, भगवान दोंदे, छाया देवांग, प्रतिभा पवार, प्रवीण तिदमे, किरण गामणे, सुवर्णा मटाले यांसह सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत उपस्थित होत्या.