होमपेज › Nashik › नाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’

नाताळ, थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत ‘झिंग झिंग झिंगाट’

Published On: Dec 23 2017 2:10AM | Last Updated: Dec 22 2017 11:20PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

नाताळ आणि थर्टी फर्स्टला बार, पब व रेस्टॉरंट पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. तर वाइन शॉप रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. गृहखात्याने याबाबत अबकारी कर विभागाशी चर्चा करून गुरुवारी (दि.21) याबाबत परिपत्रक जारी केले. या निर्णयाचे तळीरामांनी स्वागत केले असून, नाताळ व थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत झिंगाट वातावरण असणार आहे.

नाताळ व नववर्षाच्या स्वागताची नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. दरवर्षी रात्री किती वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरू ठेवावे याबाबतचे परिपत्रक शासन जारी करते. यंदादेखील शासनाच्या निर्णयाकडे पार्टीची जय्यत तयारी करणार्‍यांचे लक्ष लागून होते. नववर्षाचा आनंद मनमुरादपणे साजरा करता यावा, यासाठी शासानाने यंदा नियम शिथिल केले आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरला बार, पब आणि रेस्टॉरंट पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तर वाइन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एरव्ही वाइन शॉप रात्री साडेदहा वाजेपर्यंत बंद केले जावे, असा नियम आहे. मात्र, तीन दिवस वाइन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे तळीरामांनी स्वागत केले असले तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेवरील ताण वाढणार आहे. वेळेच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, याची जबाबदारी उत्पादन शुल्क व पोलिसांवर राहणार आहे.