Fri, Apr 19, 2019 08:37होमपेज › Nashik › निफाड तालुक्यात बालकाचा मृत्यू

निफाड तालुक्यात बालकाचा मृत्यू

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:51PMउगाव : वार्ताहर

निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे पालखेड डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या  सात वर्षाच्या मुलाचा बुडून अंत झाला. अरुण बबन माळी असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.  शनिवारी (दि.26) दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी बालकाला नैताळे आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर तेथे उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.

बोकडदरे शिवारातून जाणार्‍या पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी पाण्यात डुबकी मारायला, पोहायला जाणार्‍यांची संख्या वाढलेली आहे. दुपारी अरुण हा सुद्धा पोहण्यासाठी कालव्यावर आला होता. इतर मुलांसोबत पालखेड कालव्यात पोहण्यासाठी त्याने उडी घेतली.  मात्र, प्रवाहात बुडाला. त्याला बाहेर निघता येईना. त्यामुळे इतर मुलांनी जोरजोरात आरडा-ओरडा केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून पालखेड कालव्यावर बाळू सानप, मोतीराम मोरे, बाजीराव ससाणे, शंकर बोडके, अनंता नागरे, नारायण सानप, मच्छिंद्र सूर्यवंशी, भाऊराव दराडे, सोमनाथ बच्छाव आदींनी धाव घेतली. कालव्यात बुडालेल्या मुलाचा शोध घेतला. पण, एक तासाने घटनास्थळापासून दोनशे फुटावर सोमनाथ बच्छाव यांना अरुण पाण्यात आढळला. त्यास प्राथमिक उपचारासाठी नैताळे येथे आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने अधिक उपचारासाठी निफाड येथेे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.  पोलीसपाटील सदाशिव सानप यांनी या घटनेची खबर निफाड पोलिसांना दिली. दरम्यान, नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, नैताळेचे माजी सरपंच नवनाथ बोरगुडे, राष्ट्रवादी युवक काँगेसचे शिवाजी बोरगुडे, सोपान बोरगुडे यांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले.