Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा फ्युनिक्यूलर अहवालानंतर निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा फ्युनिक्यूलर अहवालानंतर निर्णय

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:21AMनाशिक :  

सप्तशृंगगडावर उभारण्यात आलेल्या फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर परिसराच्या ट्रॉलीच्या वरच्या बाजूला लॉजिंगचे काम, लिफ्टचे किरकोळ काम अद्यापही बाकी असून, ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यंंत्रणांना दिले. दरम्यान, तांत्रिक टीमने दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगदेवी गडावर भगवती दर्शन सुलभ व्हावे. यासाठी देशातील पहिला फ्यूनिक्यूलर ट्रॉली प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण 4 मार्चच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी गडावर मंगळवारी (दि. 27) पाहणी केली. याप्रसंगी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन व रेस्क्यू टीमचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी फ्यूनिक्यूलर ट्रॉलीच्या कामकाजाची, हेलिपॅडच्या जागेची पाहणी,  क्राऊड मॅनेजमेंट, भाविकांचा मार्ग निश्‍चिती, ट्रॉलीतून जाण्याचा मार्ग याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी ट्रॉलीमधील काही छोट्या तांत्रिक बाबींबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन व रेस्क्यू टीमला दिले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी सरकारने 4 मार्चचा मुहुर्त काढला आहे. मात्र, तरीही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अंतिम अहवालानंतरच मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचे नियोजन केले जाणार आहे.

याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, कळवणचे प्रांतधिकारी अमित मित्तल, तहसीलदार कैलास चावडे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, सप्तश्रृंग देवस्थानचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, गडाचे सरपंच राजेश गवळी आदी उपस्थित होते.