Wed, Sep 26, 2018 18:07



होमपेज › Nashik › सिन्नर-शिर्डी मार्गाच्या कामास वेग देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सिन्नर-शिर्डी मार्गाच्या कामास वेग देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:09AM



नाशिक : प्रतिनिधी

सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम प्रगतिपथावर करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भू-संपादन जलदगतीने करावे, अशाही सूचना त्यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. 

केंद्र शासनाच्या भारतमाला योजने अंर्तगत राज्यातील रस्ते विकासाबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येेथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सचिव युधीवर मलीक उपस्थित होते.

राज्यात यंदा 2 हजार किलो मीटरच्या रस्ते विकासाचे लक्ष्य आहे. ते गाठण्यासाठी मार्चपर्यंत भू-संपादन करून त्याचा मोबदला संबंधितांना देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे कामाला गती देतानाच आवश्यक असलेल्या सर्वेेक्षणाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

केंद्रीयमंत्री गडकरी यांनी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचा सखोल जिल्हानिहाय आढावा घेतला. दरम्यान, केंद्र शासनातर्फे राज्यात मार्च अखेरपर्यंत दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे प्रस्तावित असल्याचे माहिती गडकरी यांनी दिली. रस्ते विकासासाठी लागणार्‍या वन विभागाच्या परवानगीबाबत वने विभागाच्या सचिवांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यासोबत बैठक घ्यावी, असे आदेश गडकरी यांनी दिले. 

मार्चपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी जमीन अधिग्रहित करून दिल्यास पावसाळ्यापूर्वी काम सुरू करता येईल, असेही गडकरी म्हणाले. रस्ते विकासासाठी लागणार्‍या वनविभागाच्या लागणार्‍या परवानग्या, जमीन अधिग्रहण, जमीन अधिग्रहणातील काही जिल्ह्यातील अडचणी या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.