होमपेज › Nashik › मुख्यमंत्री फडणवीस आज येवला तालुक्यात

मुख्यमंत्री फडणवीस आज येवला तालुक्यात

Published On: Jan 05 2018 1:17AM | Last Updated: Jan 04 2018 11:27PM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

तालुक्यातील गवंडगाव येेथे शुक्रवारी (दि.5) नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित 10 हजार रोपांचे रोपण, अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पण व लिनी इंडस्ट्रिज मिनरल वॉटर प्लान्टचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्र्यांसह तीन मंत्री, आमदार, खासदार व विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी असणार आहे.

नाम फाउंडेशनच्या धर्तीवर नारायणगिरी महाराज फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून, फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तालुक्यात हाती घेण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक उद्योजक विष्णू भागवत व पंचायत समितीचे प्रभारी सभापती रूपचंद भागवत यांनी दिली आहे.

गवंडगाव येेथे शुक्रवारी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन असतील. प्रमुख अतिथी म्हणून जलसंधारण व राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार मारोतराव पवार, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, बारामती अ‍ॅग्रो डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, स्नेहलता कोल्हे, पांडुरंग बरोरा, राहुल  कुल, पंकज भुजबळ,  दीपिका चव्हाण, मुंबईच्या माजी महापौर स्नेहलता आंबेकर, पणन महामंडळाच्या अध्यक्षा उषा शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या वतीने तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सुमारे दहा हजार रोपांचे रोपण करण्यात येत असून, फाउंडेशन त्याचे संगोपनही करणार आहे. फाउंडेशनच्या वतीने अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार असून, येवला तालुक्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा नि:शुल्क राहणार असल्याची माहिती विष्णू भागवत यांनी दिली. फाउंंडेशन तालुक्यात आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम हाती घेणार असून, गोरगरीब, दिनदुबळ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार आहे. यासाठी एक समिती नेमणार असल्याचेही भागवत यावेळी म्हणाले.

फाउंडेशनने तालुक्यात एक कोटी वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले असून, दरवर्षी दहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण केलेल्या रोपांचे संगोपन करणार्‍या शाळा, महाविद्यालये, विविध संस्थांंना प्रोत्साहनपर बक्षिसेही दरवर्षी देण्यात येणार आहेत.