Sat, Jul 20, 2019 08:53होमपेज › Nashik › त्र्यंबकच्या नियोजनासाठी खास बैठक घेऊ

त्र्यंबकच्या नियोजनासाठी खास बैठक घेऊ

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:50PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबक केवळ तीर्थस्थळ म्हणून नव्हे, तर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करणार आहे. त्या अनुषंगाने त्र्यंबकमधील मंदिरे, मठ, रस्ते आणि शाळा, कॉलेजच्या विकास व नियोजनासाठी लवकरच मंत्रालयात विशेष बैठक बोलविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.26) आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दिले. संत श्री निवृत्तिनाथ महाराज मंदिर भूमिपूजन व भक्‍त निवासाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन

नाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वर येथे बांधण्यात येणार्‍या संत निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे, मारुतीबाबा महाराज कुर्‍हेकर, खा. हरिश्‍चंद्र चव्हाण, खा. हेमंत गोडसे, भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, आमदार बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, निर्मला गावित, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, परवेझ कोकणी, रामेश्‍वर महाराज, घुले महाराज, ललिता शिंदे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाचा योग इतरांच्या नशिबात नव्हता. तो मला मिळाला. भागवत धर्म वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवला. श्री पांडुरंगाचे नाव याच संप्रदायाने जनाजनांपर्यंत पोहोचविले. संत तुकाराम महाराजांपासून ते आजपर्यंतचा हा वारसा अखंडपणे आजही तितक्याच प्रेरणेने सुरू आहे. लाखो भाविक कसलीही तमा न बाळगता दरवर्षी पांडुरंग आणि ज्ञानोबा-तुकोबांचे नाव घेऊन वारीत सहभागी होतात, ही त्याचीच ताकद आहे. संत निवृत्तिनाथांचे काळ्या पाषाणातील मंदिर घडविण्याचे कार्य माझ्या हातून होण्यासाठीच ईश्‍वराने माझी आणि तुमची निवड केली असावी. त्र्यंबकनगरी ही धर्म व संस्कृतीचे पीठ असल्याचे गौरवोद‍्गारही त्यांनी यावेळी काढले. त्र्यंबक हे केवळ धार्मिक स्थळ म्हणून न राहता येथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी व त्यांचे नियोजन करण्याच्या द‍ृष्टीने लवकरच बैठक बोलविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी निवृत्तिनाथ महाराज मंदिराची संकल्पचित्रफीत दाखविण्यात आली.

त्र्यंबकला निर्मल वारी योजना राबविणार 

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर

त्र्यंबक ही संतांची पवित्र भूमी आहे. याच नगरीच्या नागरिकांनी त्र्यंबकची सत्ता भाजपाच्या हाती देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. जानेवारीत होणार्‍ुया संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबक येथे निर्मल वारी योजना शासनातर्फे राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी त्र्यंबक येथे केली. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व इतर नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. त्र्यंबक नगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हाती दिल्याबद्दल त्यांनी त्र्यंबकवासीयांचे आभार मानले. सर्व मतदार आमच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याध्यक्ष दादा जाधव, श्याम जाजू, आमदार सीमा हिरे, वसंत गिते, सुनील बागूल,  विजय साने, सुनील बच्छाव, श्रीकांत गायधनी, शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, विनायक माळेकर, बापू दीक्षित, तृप्ती धारणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीने कोकणी यांचा भाजपाचा मार्ग मोकळा 

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर 

संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भाजपाच्या वाटेवर असलेल्या परवेझ कोकणी यांच्या त्र्यंबक येथील घरी भेट दिली.गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोकणी यांच्या घरी स्नेहभोजन केले होते. यामुळे कोकणी यांच्या भाजपातील प्रवेशावर शिक्‍कामोर्तब झाले असून, या माध्यमातून ते विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. 

कार्यक्रम आटोपल्यानंतर रस्त्यातच कोकणी यांचे निवासस्थान लागत असल्याने मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफा रस्त्यावरच थांबला अन् अवघ्या पाच मिनिटात मुख्यमंत्री कोकणी परिवाराची भेट घेऊन मार्गस्थ झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कोकणी हे भाजपाच्या गोतावळ्यात वावरताना दिसून येत आहेत. भाजपाने तर त्र्यंबक नगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी परवेझ कोकणी यांच्यावर सोपविली होती आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्याने पक्षश्रेष्ठी कोकणी यांच्यावर खूश असल्याचेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून समोर येत आहे. यामुळे कोकणी यांचे आभार मानण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी धावती का होईना त्यांना भेट दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. केवळ पाचच मिनिटांच्या या भेटीत कोकणी परिवारातर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर हे उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माणिक कोकाटे, परवेझ कोकणी यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. त्यानंतर अचानक केदा आहेर यांचे नाव पुढे आले. कोकणी यांचे लक्ष्य विधान परिषद असल्याने त्यांनी जिल्हा बँकेसाठी उत्सुकता दाखविली नाही. आणि असेही कोकणी यांनी यापूर्वी अध्यक्षपद भोगले आहे. यामुळे त्यांनी केदा आहेरांची वाट मोकळी करून दिली. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कोकणी यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी केदा आहेर यांची उपस्थिती सर्व काही सांगून गेली.