Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Nashik › दूध भुकटी कंपन्यांना मुख्यमंत्र्यांचे अभय

दूध भुकटी कंपन्यांना मुख्यमंत्र्यांचे अभय

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी

दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा सरकारचा आदेश असला तरी प्रत्यक्षात मात्र 17 रुपयेच दर शेतकर्‍यांना मिळत असून, सरकार शब्दांचा खेळ करीत आहे. दूध भुकटी तयार करणार्‍या कंपन्या, खासगी दूध उत्पादक संघ, मंत्री व अधिकार्‍यांचे साटेलोटे असून, मुख्यमंत्र्यांचे या सगळ्यांनाच अभय असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केला. दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या सोमवारपासून पुकारलेल्या दूध आंदोलनाला किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा पाठिंबा असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

सरकार दूध दराच्या बाबतीत शब्दांचे खेळ करत असल्याचा आरोप करीत नवले म्हणाले की,  राज्यात दीडशे खासगी दूध उत्पादक ब्रॅण्ड आहेत. टोण्डच्या नावाखाली दुधात भेसळ केली जात आहे. एक टँक र दुधात भेसळ करून तीन टँकर दूध तयार केले जात असून, हे दूध शहरात वितरित केले जात आहे. खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईचा दूधपुरवठा बंद करू असे विधान केले होते. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी  मुंबई पाकिस्तानात नाही, असा टोला लगावला होता. नवले यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत मंत्र्यांनी शब्दांचे तारे तोडणे बंद करावे.

मुंबई पाकिस्तानात नाही मग, शेतकरीदेखील पाकिस्तानी आहे का, असा सवाल उपस्थित केला. दूध उत्पादक व्यवसाय भ्रष्टाचाराची गटारगंगा झाली असल्याची टीका करीत राज्यातील बहुतांश दूध उत्पादक संघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असून, या संघांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करीत असल्याचा आरोप केला. दूध उत्पादकांची लूट थांबविण्याबरोबरच  या क्षेत्राबद्दल दीर्घकालीन धोरण तयार करा, अतिरिक्त दूध अंगणवाड्या, गरोदर माता आणि गरिबांना वाटप करण्यासाठी कार्यक्रम ठरविण्यात यावा, अशी मागणीही नवले यांनी केली. एक कोटी 30 लाख लिटर दुधाचे संकलन दररोज होते.

त्यातील 80 लाख लिटर दूध प्लास्टिक बंद पिशवीतून शहरात वाटप केले जाते. उर्वरित 40 लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी जाते. खरे तर दूध भुकटी तयार करणार्‍या कंपन्यांसमोर तूट भरून काढण्याचे संकट आहे. तरीही देशात भुकटीचा महापूर असून, या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. या कंपन्यांचे ऑडिट करण्याची मागणी वारंवार करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यावेळी कॉ. राजू देसले, नाना बच्छाव, सोमनाथ बोराडे आदी उपस्थित होते.