Sun, Nov 18, 2018 05:08



होमपेज › Nashik › खुल्या जागांवर व्हावी मागासवर्गीयांची नियुक्‍ती 

खुल्या जागांवर व्हावी मागासवर्गीयांची नियुक्‍ती 

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 08 2018 10:57PM



नाशिक : प्रतिनिधी

2014 पूर्वीप्रमाणे सामाजिक आरक्षणासाठी लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिक उमेदवारांची नियुक्ती होण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने आयोगाला निर्देश द्यावेत, अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे.

सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि.13 ऑगस्ट 2014 च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्त्व समांतर आरक्षणाला लागू होत नसल्यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात  म्हटले आहे. शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपद्धतीबाबतच्या परिपत्रकामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याने हे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सूचना 27 ऑगस्टला झालेल्या बैठकीत संबंधित मंत्र्यांनी दिल्याचे भुजबळांनी निदर्शनास आणून दिले आहे. या परिपत्रकामुळे गुणवत्ता अजूनही मागासवर्गीय उमेदवारांना लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणार्‍या खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या पदांसाठी विचार केला जात नसल्याने अन्याय होत असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. आयोगाकडून खुल्या प्रवर्गातील आरक्षित जागांसाठी केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांचा विचार केला जात असल्यामुळे मागास प्रवर्गातील उमेदवारांकडे गुणवत्ता असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे. गेल्या चार वर्षांत खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देणार्‍या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीतून डावलण्याची अनेक प्रकरणे झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.