Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Nashik › महापालिकेची करवसुली खंडणीखोराप्रमाणे 

महापालिकेची करवसुली खंडणीखोराप्रमाणे 

Published On: Sep 11 2018 1:54AM | Last Updated: Sep 10 2018 11:02PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेत सध्या कर कमी करण्यावरून ‘सेटलमेंट’ सुरू आहे. मुळात जो कर पूर्वी नव्हता तो लावून त्यात कमी अधिक करण्याचे कारणच नाही. यामुळे महापालिका एखाद्या खंडणीखोराप्रमाणे जनतेच्या पैशांवर दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी करत आयुक्‍तांनी त्यांचा कारभार सुधारला नाही तर लोक कायदा हातात घेतील, असा इशारा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करवाढ रद्द करणे, बंद अंगणवाड्या पूर्ववत करणे, शहरातील झोपडपट्ट्या आहे तिथेच घरकुल योजना राबविणे, बससेवा आणि सिडको रहिवाशांच्या घरांवर कारवाई न करणे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.10) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्या संपूर्ण नाशिककर मनपा प्रशासनाच्या कारभारामुळे मानसिक तणावात आहेत. कर्मचारी आत्महत्या करत आहे, तर कोणी पळून जात आहे. आयुक्‍तांच्या नावात ‘तुकाराम’ असल्याने त्यांनी कर्मचार्‍यांकडून दडपशाहीने नव्हे, तर प्रेमाने काम करून घेतले पाहिजे. महापौर मग तो कोणत्या पक्षाचा असो प्रथम नागरिक म्हणून त्यांचा मान राखला गेला पाहिजे. 15 ते 20 हजार मतदारांतून निवडून येणार्‍या नगरसेवकांचा सन्मान ठेवला पाहिजे. करवाढ आणि जमाखर्च करताना तो सभागृहातच सादर करायला हवा. परंतु, महासभेतील ठराव आयुक्‍त फेकून देत कायदा मोडणार असेल तर उद्या लोकही कायदा हातात घेतील, असा इशाराही त्यांनी आयुक्‍तांसह सत्ताधारी भाजपाला दिला. मुंबईत झोपडपट्ट्या असलेल्या ठिकाणीच घरकुल बांधून दिले. मग नाशिकला वेगळा न्याय का? उल्हासनगर, नवी मुंबईला जादा एफएसआय देणार असेल तर जुने नाशिकसह गावठाण भागाला जादा एफएसआय देण्याची मागणी त्यांनी केली. गावठाण परिसर हा शहराचा ठेवा आहे. तो जपला पाहिजे. शहरात मोकळे भूखंड असण्यास प्राधान्य देण्याऐवजी महापालिका मात्र मोकळ्या भूखंडांवरच कर लादत आहे. त्यामुळे मोकळ्या जागा ठेवणे गुन्हा आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

प्रशासनाच्या कारभारामुळे शहरातील 150 रुग्णालये आणि 136 अंगणवाड्या बंद झाल्या. यामुळे अंगणवाडी सेविका बेरोजगार झाल्या आहेत, तर वैद्यकीय व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अनेक उद्योग, कारखाने स्थलांतरित होत आहेत. यामुळे नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरप्रमाणे नाशिककडेही लक्ष द्यावे. आयुक्‍तांना नाशिक सुधारवायला पाठविले आहे की बिघडवायला, असा प्रश्‍न करत घरे तोडून होणारा शहराचा विकास आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आणखी संघर्षात्मक आंदोलन करावे लागले तरी पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून मोर्चा निघाला. त्यानंतर हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, त्र्यंबक नाका, जलतरण तलाव, रामायण बंगला आणि महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार असा मोर्चाचा मार्ग होता. मोर्चात नाना महाले, माजी खासदार देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, मनपा गटनेते गजानन शेलार, गुरुमित बग्गा, कविता कर्डक, निवृत्ती अरिंगळे, प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, दिलीप खैरे, जी. जी. चव्हाण, समिना मेमन, शिवाजी सहाणे, लक्ष्मण मंडाले, हिरामण खोसकर, शरद कोशिरे आदी उपस्थित होते. 

सिडकोला हात लावू नका 

महापालिकेकडे हस्तांतरण करताना सिडकोवासीयांनी शुल्क भरलेले आहे. यामुळे सिडकोतील एकाही घराला हात लावू देणार नाही आणि तसा प्रयत्न प्रशासनाने करू नये, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. सिडकोचा प्रश्‍न शासन दरबारी घेऊन जा आणि त्यावर तोडगा काढा. त्यासाठी आमचे सहकार्य असेल. परंतु, कोणताही तोडगा न काढता सिडकोच्या घरांना हात लावला तर परिणाम वाईट होईल, असेही त्यांनी सांगितले. 

आम्हाला ‘अच्छे दिन’ नको  

मनपाच्या कारभारावर टीका करताना भुजबळ यांनी सत्ताधारी भाजपावरही शरसंधान साधले. गॅस सिलिंडरचे भाव आज किती आहे अशी विचारणा त्यांनी उपस्थितांना केली. त्यावर 800 रुपये उत्तर आले. पूर्वी हेच भाव 700 रुपये होते. आता अच्छे दिन नको बुरे दिनच आम्हाला परत द्या, असे आवाहन केले. 

भाजपाचा कणा लेचापेचा 

भाजपाच्या नगरसेवकांचा कणा लेचापेचा झाला आहे. एक आयुक्‍त त्यांना पेलवत नाही. चांगले काम करण्यासाठी त्रासच दिला पाहिजे असे नाही. यामुळे दादागिरी बंद करून कायद्याने वागा आणि सभागृहात प्रस्ताव नेऊन नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घ्या, असा सल्ला देत मुंढे एवढे कठोर होऊ नका. जरा पाझर फुटू द्या, अशी विनवणीही भुजबळ यांनी केली.