Sun, Jul 21, 2019 05:52होमपेज › Nashik › व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ

व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ

Published On: May 05 2018 10:55AM | Last Updated: May 05 2018 10:55AMमालेगाव : प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त झळकले, त्याचबरोबर समर्थक कार्यकर्त्यांच्या  आनंदाला उधाण आले. सोशल मीडिया भुजबळमय होऊन शुभेच्छा, अभिनंदनासह कट्टर समर्थकांचे झेंडा उंचावत काहींनी स्वतःची साहेबांसमवेतची संग्रहित छबी व्हायरल करताना ‘गद्दारां’ना ‘हिशेब  होणार, सगळ्यांचा होणार आणि बरोबर होणार’ अशी इशारेबाजी करण्याची संधी सोडली नाही.

तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. भुजबळांसाठी दिलासादायक वृत्ताला ‘सत्याचा विजय’ अशी कट्टर समर्थकीय  पावती  जोडत कार्यकर्त्यांनी क्षणात ‘डीपी’ बदलले. ‘व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ...’, ‘संघर्षाच्या वाटेवरील योद्धा परत, पुन्हा एकदा विकासपुरुष’, ‘विरोधकांनी फेकलेल्या दगडातून यशाचा  इमारतीचा रचला पाया’, ‘एकनिष्ठता साहेबांशी... आमचं लक्ष आमचा पक्ष छगन भुजबळ’, ‘हा आवाज दबणार नाही’, ‘आले शंभर गेले शंभर, भुजबळ साहेबच एक नंबर’ अशा प्रकारचे फोटोमय संदेश व्हायरल झालेत.

काहींनी तक्रारी, गार्‍हाणी मांडण्याच कर्तव्य निभावले. अंगुलीनिर्देश करणार्‍या छायाचित्रांखाली ‘काहींनी पक्षाशी अन् अप्रत्यक्ष तुमच्याशी केली गद्दारी’ ‘वेळ पाहून साथ सोडणार्‍यांना मिळणार  दणका’ अशा प्रकारच्या तक्रारींना सूर आवळला.

पेढे वाटप अन् आतषबाजी

शहर व तालुक्यातील भुजबळ समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एकच जल्लोष केला. पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा  सूर्यवंशी, सदस्य अरुण पाटील, विनोद शेलार, बाळासाहेब बागुल, शांताराम लाठर, मालेगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्यासह भुजबळ  समर्थकांनी महात्मा फुले पुतळा व छत्रपती शिवाजी  महाराज पुतळ्याजवळ गुलालाची उधळण आणि आतषबाजी केली. जळगाव निंबायतीला माजी सरपंच वामनराव ढोणे, रावसाहेब काळे आदींनी आनंदोत्सव साजरा केला.