होमपेज › Nashik › उत्पादन शुल्क विभागाची झाडाझडती

उत्पादन शुल्क विभागाची झाडाझडती

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:41PMजळगाव : प्रतिनिधी

मनपा निवडणुकीला प्रारंभ होऊन बरेच दिवस झाले आहेत. शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकही कारवाई केली नाही. निवडणुकीत मद्याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असुन विभागाने कारवाई का केली नाही, असा सवाल करून निवडणुक आयोगाच्या सचिवांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली आहे.

उमेदवारांचा दररोजचा खर्च  तपासलाच गेलाच पाहिजे, खर्चात अधिकार्‍यांना चुकीची माहिती आढळली तर त्या उमेदवारावर कारवाई करा, असे राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी आढावा बैठकीत सांगितले. तसेच व्हिडीओ चित्रीकरणासाठी 19 पथके तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, आचार संहिता विभागाचे राहुल मुंडके, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे उपस्थित होते. सचिव चन्ने म्हणाले की, मतदारांना उमेदवारांकडून पैशांचे प्रलोभण दाखविण्यात येईल. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवावे.  माहिती मिळाली तर संबंधित उमेदवारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सोशल मीडियातून जनजागृती 

निवडणूक आयोगाचे सचिव चन्ने यांनी आयुक्त डांगे यांना निवडणूक तयारी, तसेच, मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत माहिती विचारली. यावेळी आयुक्तांनी मतदानाचा टक्केवारी वाढविण्यासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, बॅनर आदी माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे सांगितले.

पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण 

पोलीस अधीक्षक कराळे यांनी निवडणुकीच्या तयारीची  माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक म्हणाले,  9 डीवायएसपी, 25 पोलीस निरीक्षक, 250 अधिकारी असा एकूण अडीच हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे. सोशल मीडियातून पसरविण्यात येणार्‍या अफवांवर लक्ष ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भरारी पथक संवेदनशील वॉर्डामध्ये फिरत असून गुन्हेगारांवार प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार केले आहे. तसेच बंदोबस्ताची माहिती निवडणूक विभागाला दिली.