होमपेज › Nashik › नाशिक मॅरेथॉनसाठी वाहतूक मार्गात बदल

नाशिक मॅरेथॉनसाठी वाहतूक मार्गात बदल

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:40AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर मार्गावर रविवारी (दि.18) नाशिक मॅरेथॉन होणार असून, हजारो नाशिककर त्यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. त्यासाठी अद्याप 13 हजार नाशिककरांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, मॅरेथॉन मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि.16) पत्रकार परिषदेत दिली. तसेच, मॅरेथॉनमध्ये धावणार्‍यांनी किट घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केलेे.

मॅरेथॉन ही तीन, पाच, दहा, 21 व 42 किलो मीटर या विविध प्रकारांत होणार असून, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, त्र्यंबकनाका सिग्नल, सीबीएस, अशोक स्तंभ, केटीएचएम महाविद्यालयासमोरील उड्डाणपूल, जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल, महात्मानगर, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल, पपया नर्सरी, पिंपळगाव बहुला, संस्कृती हॉटेल मार्गे रिटर्न एबीबी सिग्नल, हॉटेल सिबल समोरून जुना सी.टी.बी सिग्नल, भवानी सर्कलमार्गे अनंत कान्हेरे मैदान येथे मॅरेथानचा समारोप होईल. वाहतुकीची कोंडी होऊ नये व सुरक्षिततेसाठी पहाटे 4 ते दुपारी 12 या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिल. 

मायको सर्कल ते त्र्यंबक नाका या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून, वाहनचालकांनी गडकरी सिग्नल ते चांडक सिग्नल ते मायको सर्कल या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ, अशोकस्तंभ ते जेहान सर्कल व जेहान सर्कल ते एबीबी सर्कलकडे जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूकडील लेनवर स्पर्धक धावणार असल्याने ही लेन वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने रस्त्यांच्या उजव्या लेनचा वापर वाहनचालकांनी दोन्ही बाजूकडे ये - जा करण्यासाठी करावा.

एबीबी सर्कल ते पपया नर्सरी व हॉटेल संस्कृतीकडे जाणार्‍या रस्त्यांच्या डाव्या बाजूचा वापर हा येणार्‍या व जाणार्‍या वाहनांनी करायचा आहे. हॉटेल संस्कृती ते पपाय नर्सरी, एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, मायको सर्कल, अनंत कान्हेरे मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यांच्या डाव्या बाजूवरील लेनवर स्पर्धक धावणार असल्याने ही लेन वाहतुकीसाठी बंद राहील.

नाशिककडून त्र्यंबककडे जाणारी वाहतूक मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, चांडक सर्कल, मायको सर्कल, एबीबी सर्कल, पपया नर्सरी, संस्कृती हॉटेल या मार्गावरुन त्र्यंबककडे जातील.

केटीएचएम महाविद्यालय समोरील बोगदा ते सिद्धिविनायक रुग्णालय, टिळकवाडी सिग्नल ते जलतरण तलाव सिग्नल या मार्गाने तीन किमी स्पर्धक धावणार असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल.

जुना गंगापूर नाका ते कॅनडा कॉर्नर, जुना सीबीएस सिग्नल, मायको सर्कल या मार्गाच्या डाव्या लेनवरुन पाच किलो मीटर प्रकारातील स्पर्धक धावणार असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. या मार्गावरील रस्त्याच्या उजव्या बाजूचा वापर येणार्‍या व जाणार्‍या वाहनांनी करायचा आहे.