Sun, May 26, 2019 15:39होमपेज › Nashik › चांदवडला कांदा तेराशे रुपये

चांदवडला कांदा तेराशे रुपये

Published On: Jun 20 2018 1:14AM | Last Updated: Jun 19 2018 11:11PMचांदवड : वार्ताहर

चांदवड कृषी उत्पन्‍न बाजार समिती आवारात मंगळवारी (दि. 19) उन्हाळ कांद्याला तीन महिन्यांच्या कालावधीनंतर क्‍विंटलमागे एक हजार 351 रुपये भाव मिळाल्याने बळीराजा खूश झाला आहे. यावेळी उन्हाळ कांद्याची 10 हजार क्‍विंटल इतकी विक्रमी आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत वाढ होत असून, येत्या काही दिवसांत कांदा 1,500 रुपये क्‍विंटल दराने विकला जाण्याची शक्यता काही कांदा व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. 

चांदवड बाजार समितीत कांद्याला सरासरी 

1,050 रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाल्याची माहिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली. बहुतेक शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस न आणता तो चाळीत साठवून ठेवला आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम देशपातळीवर होऊन कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्यास देशपातळीवर उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. यामुळे गत सप्ताहापासून कांद्याच्या बाजारभावात नियमित वाढ होत आहे. त्यामुळे बाजारभावात झालेल्या वाढीमुळे शेतकरी बांधवांना मिळणार्‍या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणार आहे. देशांतर्गत व परदेशात महाराष्ट्रातील कांद्यास मागणी वाढल्याने कांदा बाजारभावात वाढ झालेली आहे. बाजारभावात सुधारणा झाली असली तरी चांदवड बाजार समिती आवारात शेतीमालाची आवक स्थिर आहे. मंगळवारी (दि.19) कांदा लिलावास सुरुवात होताच क्‍विंटलमागे 1,351 रुपये दर मिळाल्याने शेतकरी खूश झाले. सरासरी कांद्यास 1,050, तर कमीत कमी 500 रुपये इतका बाजारभाव मिळाला.