Sun, Nov 18, 2018 22:08होमपेज › Nashik › समीट रेल्वे स्टेशन परिसरात दोन स्फोटके नष्ट

समीट रेल्वे स्टेशन परिसरात दोन स्फोटके नष्ट

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 12:50AMचांदवड : वार्ताहर

मोदकांच्या आकाराचे स्फोटके अज्ञात व्यक्‍तीने चांदवड तालुक्यातील समीट रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेकून दिले होते. हे स्फोटके कुत्र्यांनी तोंडात धरल्याने त्यांचा स्फोट होऊन तीन कुत्रे जागीच ठार झाले तर एक कुत्रा गंभीर जखमी आहे. दरम्यान, या रेल्वे स्टेशन परिसरातून मोदकांच्या आकाराचे दोन जिवंत स्फोटके पोलिसांनी शुक्रवारी (दि.2) ताब्यात घेत नष्ट केले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
समीट रेल्वे स्टेशनच्या परिसरात मोदकांच्या आकाराचे काही स्फोटके अज्ञात व्यक्‍तीने आणून टाकले होते. गुरुवारी (दि.1) दुपारी व सायंकाळच्या वेळी काही मोकाट कुत्र्यांनी ही स्फोटके तोंडात धरले असता ते दाताखाली दाबले गेल्याने त्यांचा स्फोट होऊन तीन कुत्रे जागीच ठार तर एक कुत्रा गंभीर जखमी झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रेल्वेचे पोलीस अधिकारी, सीआयडी, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे 3 वाजेपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह शोध पथकाने समीट रेल्वे स्टेशनचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, रात्रीच्या वेळी अंधार असल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. शुक्रवार (दि.2) रोजी सकाळी सहा वाजेपासून पोलिसांनी पुन्हा शोध कार्य हाती घेतले. स्फोटकांचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.