Tue, Jun 25, 2019 15:55होमपेज › Nashik › निवृत्त शहर अभियंत्याचे महापालिकेस आव्हान 

निवृत्त शहर अभियंत्याचे महापालिकेस आव्हान 

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:32AM
नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीबाबत महापालिका प्रशासन आणि चौकशी अधिकारी हांगे यांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भात येत्या 16 जानेवारी रोजी सुनावणी असून, याबाबत पवार यांचे वकील अ‍ॅड. विशाल तांबट यांनी महापालिकेला तसे कळविले आहे. 

तत्कालीन आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी यू. बी. पवार यांच्यासह सहा ते सात अधिकार्‍यांवर विविध स्वरूपाचे आरोप ठेवत त्यांच्याविरुद्ध चौकशी प्रस्तावित केली होती. त्यास महासभेने मान्यता दिली होती. यामुळे संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र ठेवले होते. पवार यांच्यावर 257 कोटींच्या रस्त्यांची कामे, त्यांची निविदा प्रक्रिया, योग्य प्रकारे सर्वेक्षण व माहिती न घेताच रस्त्यांची कामे प्रस्तावित करणे, इत्यादी तक्रारींचा निपटारा न करणे यासह विविध प्रकारचे आरोप मुंढे यांनी करत त्यांची चौकशी प्रस्तावित केली होती. सध्या यू. बी. पवार हे सेवानिवृत्त असून, त्यांनी संबंधित आरोपांना तसेच त्यांची चौकशी करणारे अधिकारी बी. सी. हांगे यांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हांगे क आणि ड श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या चौकशी करू शकतात.

त्यावरच्या श्रेणीतील अधिकार्‍यांची चौकशी करण्यास हांगे हे सक्षम अधिकारी नाहीत. याशिवाय चौकशी कोणी करावी व कोणी नाही याबाबतही शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आपली चौकशी करताना त्याचे पालन होत नसून, त्याबाबतचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी उच्च न्यायालयाला याचिकेद्वारे केली आहे. तसेच, महापालिका प्रशासनाने केलेले आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून, सबळ कारण न देताच दोषारोप ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. यासंदर्भात आता 16 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. पवार यांचे वकील अ‍ॅड. विशाल तांबट यांनी महापालिकेला तशी नोटीस जारी केली आहे. यामुळे या सुनावणीत काय होते याकडे लक्ष लागून आहे.