Mon, Aug 19, 2019 07:47होमपेज › Nashik › सेंट्रल बँक फोडणारे तिघे गजाआड

सेंट्रल बँक फोडणारे तिघे गजाआड

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:50PMनाशिक : प्रतिनिधी

सप्टेंबर 2017 मध्ये सिन्‍नर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियातील तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्वप्निल ऊर्फ भूषण सुनील गोसावी (19, रा. देवीमंदिर रोड, सिन्नर), अर्जुन गोरख धोत्रे (23) आणि करण प्रकाश घुगे (23 दोघे रा. सिन्नर) अशी या संशयितांच नावे आहेत. 

तिघा संशयितांकडून चोरीच्या चार दुचाकी, इतर घरफोड्यांमधील मोबाइल, रोकड असा 1 लाख 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. तिघांकडून घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

सप्टेंबर महिन्यात सिन्‍नरमधील बँकेची पाठीमागील भिंत फोडून संशयित बँकेत शिरले. त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही व डीव्हीआर मशिनची तोडफोड केली. त्यानंतर बँकेतील रोकड ठेवलेली तिजोरी चोरण्याचा प्रयत्न करताच बँकेतील सायरन वाजला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले होते. याप्रकरणी सिन्‍नर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्यासह पथकाने संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझर परिसरात घरफोडी करणारे संशयित लपल्याचे समजले. त्यानुसार ओझर येथे सापळा रचून पोलिसांनी स्वप्निल यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुन आणि करण यांच्यासोबत सेंट्रल बँक ऑफ इंडियात घरफोडीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून त्यांनी सिन्नर आणि ओझर येथे चोरलेल्या दुचाकी जप्‍त करण्यात आल्या. तसेच, 2 घरफोड्यांमधील मोबाइल आणि रोकड असा मुद्देमालही जप्‍त करण्यात आला. 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम कर्पे, सहायक उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, कैलास देशमुख, मुनीर सय्यद, पोलीस नाईक दिलीप घुले, प्रितम लोखंडे, रावसाहेब कांबळे, शिपाई सुशांत मरकड, मंगेश गोसावी, हेमंत गिलबिले. प्रदीप बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.