Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Nashik › बँका,उद्योगांमध्ये विश्‍वास महत्त्वपूर्ण 

बँका,उद्योगांमध्ये विश्‍वास महत्त्वपूर्ण 

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:12AMनाशिक : प्रतिनिधी

देशातील लघुउद्योगांच्या विकासासाठी बँक आणि उद्योग यांच्यामध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे. सरकार, बँका आणि उद्योग क्षेत्रातील विविध संघटना यांच्यात चांगला संवाद झाला तरच मोठ्या आणि लघुउद्योगात येणार्‍या अडचणींवर सहज मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व केंद्रीय अर्थ खात्याचे सल्लागार डॉ. आशुतोष रारावीकर यांनी केले.

बीबीएनजी अर्थात ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल या ब्राह्मण उद्योजकांच्या तिसर्‍या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी रारावीकर  बोलत होते. ते म्हणाले की, नाशिक संरक्षण, अन्नप्रक्रिया, शेतीविषयक उद्योग सुरू करता येणार असून, त्यांना खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यातील कोणता व्यवसाय करता येईल का, असा विचार करणे गरजेचे आहे. आरबीआयने केलेल्या सूचनेनुसार एसएमई कॉर्नर सुरू केले असून, त्या सध्या मुंबई, ठाणे, पुणे येथे सुरू केले असून, त्याद्वारे तीन दिवसांत कर्ज उपलब्ध होणार, असेही ते म्हणाले.

परिषदेच्या सुरुवातीला बीबीएनजीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात उद्योगात सातत्य गरजेचे असल्याचे सांगितले. संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा म्हणाले की, पूर्वी समाजव्यवस्थेत कामांची विभागणी केलेली होती. आता चित्र पूर्णपणे बदलले असून, उद्योग व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आगामी काळात अर्थकारण हे पूर्णपणे बौद्धिक क्षमतेवरच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.  गुरुदत्त टोणगावकर यांनी विकसित केलेल्या बीबीएनजीच्या मोबाइल अ‍ॅपचे लाँचिंग करण्यात आले. स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सोबतच दोन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मंचावर अशोका बिल्डकॉनचे संचालक संजय लोंढे, मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे आदी मान्यवर उपस्थित होते.  परिषदेच्या दुसर्‍या सत्रात चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रेरणादायी वक्ते समीर देसाई यांनी तरुण उद्योजकांशी जनरेशन नेक्स्ट या शृंखलेमध्ये कौटुंबिक व्यवसाय नव्या उंचीवर नेणार्‍या तरुण उद्योजकांशी संवाद साधला. यात  सौरभ भोगले,  परीक्षित प्रभुदेसाई,  चैतन्य चिंचलीकर व   ओम मोहोरीर सहभागी झाले. परिषदेस महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे 400 हून अधिक ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक सहभागी झाले. समारोप सत्रात लक्ष्मण सावजी,मधुरा कुंभेजकर, रोहन कुलकर्णी, महेश देशपांडे ,समीर मुळे, यशवंत वेसीकर, सलील केळकर, दिनेश शर्मा, अविनाश शुक्ल, रोहित कावळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.