Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Nashik › आज सर्वत्र ‘गटारी’ची धूम

आज सर्वत्र ‘गटारी’ची धूम

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMनाशिक : प्रतिनिधी

हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिना रविवारपासून (दि. 12) सुरू होणार असल्याने शनिवारी (दि. 11) अनेकांकडून ‘गटारी’ साजरी होणार आहे. शनिवारी गटारी आल्याने काही जणांची गोची झाल्याने त्यांनी शुक्रवारीच ‘गटारी’ साजरी केली.

हिंदू धर्मात श्रावण हा अत्यंत पवित्र व व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार अन्य दिवशी उपवास केला जातो. या महिन्यात बहुतांश लोक या महिन्यात मांसभक्षण व मद्यपान वर्ज्य करतात. या गोष्टींचा महिनाभराचा ‘वियोग’ सुसह्य करण्यासाठी अनेक जण आषाढाच्या अमावास्येला भरपूर मांसभक्षण, मद्यपान करतात. त्यामुळे या अमावास्येला काही वर्षांपासून ‘गटारी’ असे संबोधन प्राप्‍त झाले आहे. यंदा शनिवारी (दि. 11) आषाढ अमावास्या असून, या दिवशी तळीरामांकडून जंगी गटारी होणार आहे. त्याचे नियोजन शुक्रवारीच सुरू होते. मित्रमंडळींकडून ‘बैठकी’ची ठिकाणे ठरवली जात होती. दुसरा शनिवार असल्याने शासकीय कार्यालये व कंपन्यांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे अनेकांनी सकाळपासून ‘आउटिंग’चे नियोजन केले आहे. अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवरही यासंदर्भातील चर्चा सुरू होत्या. 

दरम्यान, एकीकडे गटारी शनिवारी आल्याने काहींची चंगळ होणार असली, तरी धार्मिक प्रवृत्तीच्या मद्यप्रेमींची मात्र काहीशी गोची झाली आहे. काही जण सोमवार, गुरुवार व शनिवार या दिवशी मांसभक्षण व मद्यसेवन करीत नसल्याने त्यांना गटारीच्या निमित्ताने हा नियम मोडावा लागणार आहे, तर काहींना हात चोळत बसावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेकांनी शुक्रवारीच गटारी साजरी केली. त्यामुळे सायंकाळनंतर शहरातील बर्‍याच बारमध्ये तळीरामांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत गटारीचे हे ‘आगाऊ’ सेलिब्रेशन सुरू होते.