होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील ‘वॉर्निंग कार’ ऐनवेळी ‘बेकार’

मुख्यमंत्र्यांची ‘वॉर्निंग कार’ ऐनवेळी ‘बेकार’

Published On: Dec 27 2017 9:44AM | Last Updated: Dec 27 2017 9:52AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओझर विमानतळावरून त्र्यंबकेश्‍वरच्या दिशेने जात असताना त्यांच्या ताफ्यात पोलीस प्रशासनाकडील सर्व नव्या कोर्‍या कार धावत होत्या. मात्र, महत्वपूर्ण जबाबदारी असलेली ताफ्यातील सर्वांत पुढची वॉर्निंग कार जुनीच असल्याने अर्ध्या रस्त्यातच ही कार ऐनवेळी बंद पडली. कार नादुरुस्त झाल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. यामुळे या कारची भूमिका दुसर्‍या व्हॅनने बजावत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यास त्र्यंबकेश्‍वरला पोहोचवले.

मंगळवारी (दि.26) संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन आणि भक्‍तनिवास उद्घाटनासाठी दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री ओझर विमानतळावरून त्र्यंबकेश्‍वरला निघाले. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा ताफा इच्छितस्थळी वेळेत पोहोचला पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून नुकत्याच दाखल झालेल्या नव्या कोर्‍या कार ताफ्यासाठी दिल्या होत्या. मात्र, ताफ्यात सर्वात पुढे असलेली वॉर्निंग कार मात्र जुनीच होती. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा वेग कुठेही कमी होऊ नये याची मुख्य जबाबदारी असलेली वॉर्निंग कार भरधाव वेगाने पुढे जात होती. सायरन वाजवत प्रत्येक पॉइंटवरील बंदोबस्त सतर्क केला जात होता. मात्र, ऐनवेळी संस्कृती हॉटेलजवळ येताच वॉर्निंग कार
नादुरुस्त झाली. याची माहिती पोलिसांच्या बिनतारी संदेशवहन यंत्रणेवरून वरिष्ठांना कळवण्यात आली. दरम्यान, ताफ्यामधील दुसर्‍या कारने वॉर्निंग कारची भूमिका बजावत मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे नेला. त्यानंतर तातडीने दुसर्‍या वॉर्निंग कारची व्यवस्था करण्यात आली. या घटनेने पोलीस वर्तुळात चर्चा रंगल्या.

काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस दलात 15 नवीन कार दाखल झाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातही या कार असणे स्वाभाविक होते. मात्र, वॉर्निंग कार जुनाट दिल्याने आणि तीदेखील नादुरुस्त झाल्याने पोलीस प्रशासनास ऐनवेळी धावपळ करावी लागली. पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत वॉकीटॉकीवरून संबंधित मोटार परिवहन विभागास धारेवर धरले.