Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच नाशिकला : आयुक्‍त मुंढे

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच नाशिकला : आयुक्‍त मुंढे

Published On: Feb 10 2018 10:31AM | Last Updated: Feb 10 2018 10:31AMनाशिकः प्रतिनिधी

मनपा आयुक्‍तपदी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्याविषयी अनेक राजकीय चर्चा रंगल्या. त्यात भाजपातीलच काही गटांमधील पदाधिकार्‍यांनी श्रेय लाटण्याचादेखील प्रयत्न केला. परंतु, या सर्व पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आपण नाशिक येथे आलो असून, बससेवा, आयटी, ई-गव्हर्नन्स आणि स्मार्ट सिटीतील प्रकल्प पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगत सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

बससेवा ताब्यात घेण्यापूर्वी या सेवेची शहराला गरज आहे का? आणि या सेवेमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकेल का? या गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शहराचे पर्यावरणदृष्ट्या आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक सक्षम असणे गरजेचे आहे. यामुळे शहर प्रदूषणमुक्‍त ठेवण्यासाठी बससेवेला आपले प्राधान्य असेल असेही त्यांनी नमूद केले. बससेवा सुरू करण्याबरोबरच शहरातील पार्किंगवरही लक्ष केंद्रित करणार असून, ऑफ रोड आणि ऑन रोड अशा दोन्ही प्रकारच्या पार्किंगचा विचार केला जाईल. त्यात ऑन रोड पार्किंगसाठी वाहनधारकांकडून जादा दर आकारले जातील.

वॉक विथ कमिशनर
नागरी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मुंबईसह काही ठिकाणी आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही येत्या काळात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे या उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या मार्गी तर लागणारच. परंतु, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मात्र झोप उडणार आहे.

कचरा विलगीकरण करणार

शहरातून विविध ठिकाणांहून कचरा संकलन करताना संबंधित ठिकाणांवरूनच कचरा विलगीकरण करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. 31 मार्चअखेरपर्यंत शहरात शंभर टक्के कचरा विलगीकरणाचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर रस्त्यावरील आणि इतरही ठिकाणची दररोज स्वच्छता होते की नाही याबाबत संबंधित अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनी लक्ष घातले पाहिजे. आपण स्वत: यासंदर्भात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डीएसआर रेटनुसारच कामे

महापालिकेतील विविध कामे यापुढे डीएसआर रेटनुसारच मंजूर केली जातील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. यामुळे याआधी मनमर्जीनुसार तसेच प्राकलन दरापेक्षा 25 ते 40 टक्के कमी दराने काम करणार्‍या लॉबीला आळा बसणार आहे. या आधीच्या कामांचीही पडताळणी करणार का असा प्रश्‍न विचारला असता अशी कामे नियमबाह्य होणार नाहीत, याची आपण दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नगरसेवकांची कामेदेखील नियमानुसारच होतील, असे सांगत कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. मनपामार्फत होणारी कामे गुणवत्तापूर्ण असतील त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट स्वरूपाचे संकेतही त्यांनी मनपातील ठेकेदार व काही संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

नवीन अतिक्रमणांना आळा

शहरात यापुढे नवीन अतिक्रमण उभे राहणार नाही. सध्या असलेली अतिक्रमणे हटवून संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच शासन धोरणानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील. परंतु, या धोरणात जी कामे बसणार नाही त्याबाबत मात्र कारवाईचे पाऊल उचलले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा महापालिकेतील मनुष्यबळाचा विचार करता मनपाने शासनाकडे पाठविलेल्या आकृतिबंधाचा पाठपुरावा करून भरती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परंतु, ज्याठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरती करणे आवश्यक आहे तिथे त्याच पद्धतीने भरती करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, आता मनपातील नगरसेवक तसेच सफाई कामगारांच्या संघटनांचा नेमका याच कंत्राटी भरतीला विरोध असल्याने आयुक्‍त हा गुंता कशा प्रकारे वेगळा करतात याकडे लक्ष लागून आहे. तूर्तास मनुष्यबळ कमी असले तरी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून तसेच स्किल्ड मॅन पॉवरचा उपयोग करून मनपातील कामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

प्रेशर नाही परंतु, चुक करू नका!
अधिकार्‍यांवर कोणत्याही प्रकारचे प्रेशर राहणार नाही, असे आपण खातेप्रमुखांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. मात्र, नियमानुसार कुणी काम करत नसल्याचे आढळून आले तर अशा अधिकार्‍यांची खैर नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी देत प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना कुणालाच घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मनपातील काही अधिकार्‍यांच्या प्रलंबित असलेल्या चौकशी प्रकरणांची माहिती घेऊन त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच चौकशीसाठी कालमर्यादा ठरवून दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ऑफिस आहे की...
सायंकाळी मुंढे यांनी आस्थापना विभागासह काही कार्यालयांना भेटी देऊन कर्मचारी व अधिकार्‍यांची ओळख करून घेत कामकाजाच्या सूचना दिल्या. या भेटीत त्यांनी राजीव गांधी भवनातील स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तेथील दुर्गंधी आणि अवस्था पाहून प्रशासन उपायुक्‍तांना हे ऑफिस आहे की मुतारखाना असा प्रश्‍न उपस्थित केला. मनपातील बहुतांश सर्वच स्वच्छतागृहांची अवस्था अशी आहे.