Wed, Nov 21, 2018 09:14होमपेज › Nashik › सिडकोवासीयांना दिलासा : अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबणार!

सिडकोवासीयांना दिलासा : अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबणार!

Published On: Jun 01 2018 12:23PM | Last Updated: May 31 2018 10:51PMनाशिक : प्रतिनिधी

सिडकोतील 25 हजार घरांचे अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई तत्काळ थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या लेखी आदेशामुळे सिडकोवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सीमा हिरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मनपाकडून होत असलेली कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. 

पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या नगररचना आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने संयुक्‍तरीत्या रायगड चौक, शिवपुरी चौक यासह विविध ठिकाणी अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर लाल रंगाचे रेखांकन करण्यास सुरुवात केली होती. मनपाने अचानकपणे उचललेल्या या पावलामुळे सिडकोवासीयांमध्ये खळबळ उडाली. बांधलेली घरे तोडणार असल्याच्या भीतीने नागरिकांनी पहिल्या दिवसापासूनच अधिकार्‍यांना घेराव घालत रेखांकन करण्याचे काम थांबविले होते. त्यानंतरही अशाच प्रकारचा विरोध झाला. याशिवाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीदेखील मनपाच्या कारवाईला विरोध करत सिडकोतील घरे नियमित करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आयुक्‍तांना सादर केले होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संस्थांनी एकत्र येत सिडको संघर्ष समितीची स्थापन करून जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता. मनपाकडून रेखांकनाची कारवाई सुरू असतानाच आमदार सीमा हिरे यांनी सिडकोतील काही भागांत पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.

तसेच त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनपा प्रशासनाकडून पश्‍चिम या आपल्या मतदार संघातील 25 हजार घरांवरील अतिक्रमण काढण्याच्या होत असलेल्या कारवाईला त्वरित थांबविण्याचे आदेश मनपा आयुक्‍तांना द्यावे, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी करून आयुक्‍तांना तुर्तास कारवाई थांबवावी, अशी सूचना केली होती. हे वृत्त सिडकोत येऊन धडकताच सिडकोवासियांकडून आनंद व्यक्‍त करण्यात आला. परंतु, त्यानंतर दुसर्‍या दिवशी आयुक्‍तांनी आमदार सीमा हिरे यांनाच आव्हान देत मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश आलेले नसल्याने सिडकोतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच असे वक्‍तव्य केले होते. यामुळे जनभावना पुन्हा उफाळून येत रेखांकन करणार्‍या अधिकार्‍यांना सिडकोत पायच ठेवू देणार नाही, असे सिडकोतील नागरिकांनी ठणकावून सांगितले होते. दरम्यान, लेखी आदेश नसल्याचे सांगणार्‍या प्रशासनाला थेट लेखी आदेशच प्राप्‍त झाल्याने सिडकोवरील कारवाई थांबणार असून, सिडकोवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.