Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Nashik › बसची ट्रॅक्टरला धडक; तीन सफाई कर्मचारी गंभीर

बसची ट्रॅक्टरला धडक; तीन सफाई कर्मचारी गंभीर

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:19PMसातपूर : वार्ताहर

त्र्यंबकेश्‍वरहून नाशिकच्या दिशेने येणार्‍या भरधाव बसने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने तीन महिला सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर बसचालक अपघातानंतर फरार झाला असून, बसमधील प्रवाशांना मुका मार लागला आहे. सातपूर पोलीस ठाण्याजवळ सोमवारी (दि.23) सायंकाळी 4.30 च्या सुमारास हा अपघात झाला. 

राधा मच्छिंद्र साळवे (29), सुगंधा महेंद्र साळवे (35) आणि वंदना समाधान साळवे (26, तिघे रा. धुडगाव, ता. नाशिक) अशी अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. सातपूर पोलीस ठाण्याजवळील हॉटेल जिंजर समोरच्या रस्त्यावर मनपा कर्मचार्‍यांमार्फत रस्ता दुभाजकाच्या साफसफाईचे काम सुरू होते. कचरा गोळा करण्यासाठी दुभाजकाजवळ एमएच 15 ईएस 9722 क्रमांकाचा ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. त्याचवेळी एमएच 12 ईएफ 6618 क्रमांकाची शहर वाहतूक बस त्र्यंबेकश्‍वरहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस भरधाव वेगाने ट्रॅक्टरवर जाऊन आदळली.

बसची धडक जोरदार असल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे 15 फूट लांब फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या मूर्तिकाराच्या झोपडीसमोर अडकला. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला ट्रॅक्टर अडकल्याने अपघाताची गंभीरता कमी झाली. दरम्यान, एका महिलेच्या दोन्ही पायांवरून बस गेल्याने या महिलेस पाय गमवावे लागले, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातात बसचालक आर. सी. आवारे यांना किरकोळ दुखापत झाली असून, ते फरार झाले. तर बसवाहक सुनीता तेलंग यांना मुका मार लागल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags : Nashik,  Bus tractor accident, Three cleaning staff, serious, nashik ne