Wed, May 22, 2019 23:09होमपेज › Nashik › दुचाकी चोरणारी बुलेट गँग मालेगावी जाळ्यात

दुचाकी चोरणारी बुलेट गँग मालेगावी जाळ्यात

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:11AMमालेगाव : वार्ताहर

शहर व परिसरासह नाशिक व पुणे जिल्ह्यातून मोटर सायकली चोरणार्‍या बुलेट गँगचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 8 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

 ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे व अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शनिवारी (दि.7)  करपे हे पथकासह गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती शहरात महागड्या मोटर सायकल कमी किमतीत विक्री करणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे स् मिल्लत चौक परिसरात सापळा रचून संशयित सय्यद शोएब उर्फ नवाब सैय्यद सलीक (रा. कुसुंबा रोड), सैय्यद उस्मान सैय्यद युसूफ (रा. सरदारनगर) यांनाताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सिल्व्हर रंगाची बुलेट मोटर सायकल जप्त केली. सदर मोटर सायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्या मोटर सायकली त्यांचा साथीदार इम्रान खान लुकमान खान उर्फ लुक्या (रा. राजानगर, चुनाभट्टी) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना विश्‍वासात घेतले असता त्याच्या ताब्यातून दोन काळ्या रंगाच्या मोटर सायकल हस्तगत केल्या.

तर इम्रान खान उर्फ लुक्या याला चुनाभट्टी परिसरातून ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची बुलेट व होण्डा युनिकॉर्न अशा दोन बनावट नंबर प्लेट असलेल्या मोटर सायकली जप्त केल्या. यानंतर त्यांचा आणखी एक साथीदार शेख मेहमुद शेख मेहबुब उर्फ याकुब (रा. दानिश पार्क, देवीचा मळा) यास ताब्यात घेतले. अलीकडेच त्यांनी बुलेट गँग तयार केली होती. या गॅगचा म्होरक्यासह तिघा आरोपींनी शहरासह पुणे जिल्ह्यातून मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून तीन बुलेट, तीन होण्डा युनिकॉर्न, 1 स्प्लेंडर, 1 टीव्हीएस सुझुकी मोपेड अशा 8 मोटर सायकली हस्तगत केल्या.  पथकात सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, हवालदार राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांचा समावेश होता.