Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Nashik › बिल्डिंग प्लॅन मंजुरीचे अधिकार वास्तुविशारदांना

बिल्डिंग प्लॅन मंजुरीचे अधिकार वास्तुविशारदांना

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:52PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

दोनशे चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे बिल्डिंग प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार वास्तुविशारदांना देण्यात आले असून, याबाबत नगररचना विभागाकडून पुढील आठवड्यात आदेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे मनपा नगररचना विभागातील कामांचा ताण निम्म्याने कमी होणार आहे. शिवाय वास्तुविशारदांवरील जबाबदारीत आणखी वाढ होणार आहे.

शासनाने 22 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पुणे मनपात कारभारही सुरू झाला आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही शासन आदेशाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. 200 चौ. मी. क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले बिल्डिंग प्लॅन मंजुरीचे सर्वाधिक प्रस्ताव नगररचना विभागाकडे प्राप्त होत असतात. त्यामुळे या प्रस्तावांची छाननी करून त्याला मंजुरी देण्यापर्यंत मोठा विलंब लागतो. त्यामुळेच शासनाने अशा बिल्डिंगला मान्यता देण्याचे अधिकार वास्तुविशारदांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वेळ आणि मनुष्यबळाची बचत होऊन मोठ्या गृहप्रकल्पांसाठी अधिक वेळ देता येऊ शकणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. आराखडा मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले असले तरी त्याबाबतची सर्व जबाबदारी वास्तुविशारदांवरच सोपविण्यात आली आहे. बिल्डिंग प्लॅन मंजूर केल्यानंतर तो एका आठवड्याच्या आत नगररचना विभागाला सादर करण्याचे बंधनही वास्तुविशारदांना घालण्यात आले आहे.