Mon, Jun 17, 2019 05:04होमपेज › Nashik › बिल्डरला कोट्यवधींचा गंडा

बिल्डरला कोट्यवधींचा गंडा

Published On: Aug 30 2018 1:22AM | Last Updated: Aug 30 2018 1:06AMनाशिक : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिकाच्या जागेबाबत व्यवहार करण्याच्या नावाखाली बनावट दस्त आणि शिक्के मारून त्या आधारे संशयितांनी सुमारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेत बांधकाम व्यावसायिकास गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुयोजित इन्फ्रास्ट्रक्‍चरचे संचालक अनंत केशव राजेगावकर (53, रा. मॉडेल कॉलनी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. 

अभिषेक व्ही. जैसवाल, अखिलेश व्ही. जैसवाल आणि संतोष व्ही. जैसवाल यांच्यासह बजाज फायनान्स कंपनीतील अधिकारी व संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैसवाल  यांची बॉटल सम्राट नावाची कंपनी आहे. राजेगावकर यांची सातपूर शिवारात जागा असून, बद्रीप्रसाद जयस्वाल यांनी या जागेचा व्यवहार केला. जयस्वाल यांनी राजेगावकर यांच्या कंपनीसोबत खरेदीखत तयार करून आगाऊ तारखेचे धनादेश देत व्यवहाराचा दस्त तयार केला. दरम्यान, धनादेश बँकेत न वटल्याने राजेगावकर यांनी जैसवाल यांच्याकडे चौकशी केली, तसेच दस्त रद्द करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात गेले. मात्र, या कालावधीत संशयितांनी राजेगावकर यांच्याकडील जागेचा बनावट दस्त तयार करून त्यात एचडीएफसी बँकेत पूर्ण भरणा केल्याचे नमूद करीत बनावट दस्त तयार केला. तसेच, या दस्तावर दुय्यम उपनिबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का मारून त्या दस्ताच्या आधारे बजाज फायनान्स कंपनीतील अधिकार्‍यांसोबत संगनमत करीत जैसवाल यांनी 11 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. दरम्यान बद्रीप्रसाद जैसवाल यांचे निधन झाल्याने त्यांच्या कंपनीचे संचालक म्हणून मुले आणि पत्नी यांची नावे लागली. त्यामुळे पोलीस ठाण्यात तिघांसह बजाज फायनान्सचे संचालक व अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.