Wed, Jul 17, 2019 11:00होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे ब्रॅण्डिंग

नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे ब्रॅण्डिंग

Published On: Jun 27 2018 12:18AM | Last Updated: Jun 27 2018 12:06AMनाशिक : प्रतिनिधी

पौराणिक महत्त्व ते वाइन कॅपिटल अशी ओळख निर्माण करणारी नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व केंद्रे लवकरच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटनांच्या ब्रॅण्डिंगसाठी संकेतस्थळ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी एका खासगी संस्थेची मदत घेण्यात येत आहे. 

बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगगड, निसर्गाची मुक्‍त उधळण लाभलेले इगतपुरी, मांगीतुंगी यासह इतिहासाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले, धार्मिकस्थळे जिल्ह्यात आहेत. याशिवाय अनेक पिकनिक पॉइंटही उपलब्ध आहेत. वाइनमुळे नाशिकचे नाव जगभरात पोहोचले आहे. मात्र, या सार्‍यांच्या ब्रॅण्डिंगमध्ये जिल्हा कमी पडला आहे. परिणामी, पर्यटनासाठी मोठी संधी असताना जिल्हा त्यात मागे पडला आहे. मात्र, याच गोष्टींच्या माध्यमातून आता जिल्ह्याचे ब्रॅण्डिंग करत पर्यटन वाढीला आणि त्यातून रोजगारनिर्मितीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्याची माहिती देणारे संकेतस्थळ तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे. 

जिल्हा प्रशासनाने खासगी संस्थेच्या मदतीने तयार करत असलेल्या या संकेतस्थळामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे व त्याचे महत्त्व, पर्यटन विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या विविध योजना (ब्रेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्ट, हॉटेल्स) यासह जिल्ह्यातील हॉटेल्स, जिल्ह्यातील महत्त्वाचे खाद्यपदार्थ आदी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच महत्त्वाच्या ठिकाणचे संपर्क क्रमांकही त्यात दिले जाणार असल्याचे समजते आहे.  संकेतस्थळ कार्यन्वित झाल्यानंतर जगाच्या कानाकोपर्‍यात बसून एका क्‍लिकवर नाशिकची ओळख व माहिती पोहोचण्यास मदत मिळेल. यातून खर्‍या अर्थाने नाशिक हे पर्यटनाच्या दृष्टीने पुढील नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून उदयास येण्यास आणि त्यातून रोजगारनिर्मित्तीस हातभार लागेल, यात शंका नाही.