Thu, Jul 18, 2019 06:42होमपेज › Nashik › शालिमारला आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

शालिमारला आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 10:26PMद्वारका : वार्ताहर

शालिमार चौक येथील श्रमिक सेना कार्यालयाच्या पाठीमागील भागात अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून संशयास्पद स्थितीत हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात महिलेच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे निश्‍चित कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. 

रविवारी (दि.28) दुपारी बाराच्या सुमारास शालिमार परिसरात दुर्गंधी पसरली होती. काही नागरिकांनी पाहणी केली असता विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आणि श्रमिक सेना कार्यालयाच्या भिंतीजवळ एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अंदाजे दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने महिलेचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. पंजाबी ड्रेस घातलेल्या 30 ते 40 वयोगटातील या महिलेचा मृतदेह असून तिची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. सुरुवातीस मृतदेहाची अवस्था पाहून या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. शवविच्छेदन अहवालात मृतदेह कुजल्याने महिलेच्या शरीरावर मारहाण किंवा संशयास्पद खुना आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

दरम्यान, महिलेच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना दूर सारून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला.