Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Nashik › दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 10:39PMमालेगाव : वार्ताहर

शहरातील विविध भागांतून मोटरसायकल चोरून कमी किमतीत विक्री करणार्‍या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त  पोलिसांनी जप्त केल्या असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. ही मोटरसायकल चोरांची टोळी सापडल्याने मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता आहे.

गत काही दिवसांपासून शहरातून मोटर सायकल चोरीला जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मोटरसायकल मालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आढावा घेऊन त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरात मंगळवारी (दि.4) गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक करपे यांना खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही जण शहरातून चोरी केलेल्या महागड्या मोटरसायकली कमी किमतीत विक्री करणार असल्याचे समजले. 

त्याप्रमाणे कर्पे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, सुनील अहिरे, पोलीस हवालदार वसंत महाले, राजू मोरे, सुहास छत्रे, सुनील पानसरे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांच्या पथकाने संवदगाव फाटा येथे सापळा रचून संशयित इसम फय्याज अहमद रियाज अहमद (रा. संवदगाव फाटा आलीया हाज्जीन मशिदीजवळ) व अजीज ऊर्फ जुम्मन अहमद नजीर अहमद (रा. जाफरनगर मालेगाव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन मोटरसायकली जप्त केल्या. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या मोटर सायकली राधिका हॉटेल व आझादनगर भागातून चोरी केल्याची कबूली दिली.

तसेच त्यांनी त्याचा साथीदार मोहमद एकलाख मोहमद शरिफ (रा. राहुलनगर कालीकुट्टी) याच्यासह शहरातील विविध ठिकाणावरून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार मोहमद यास कालीकुट्टी भागातून ताब्यात घेतले. त्यांनी आझादनगर, किल्ला, कॅम्प रोड तसेच चाळीसगाव येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. या आरोपींच्या ताब्यातून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.