Fri, Mar 22, 2019 05:35
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मखमलाबादला दुचाकींची जाळपोळ

मखमलाबादला दुचाकींची जाळपोळ

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 15 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

मखमलाबाद गाव परिसरातील रॉयल टाउनमधील सिद्धिविनायक इमारतीच्या पार्किंगमध्ये अज्ञात समाजकंटकांनी चार दुचाकींची जाळपोळ केली. शनिवारी (दि.14) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जून महिन्यातही अज्ञात समाजकंटकांनी या पार्किंगमधील दुचाक्यांचे नुकसान केल्याची तक्रार म्हसरूळ पोलिसात रहिवाशांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने संशयितांनी दुचाकींची जाळपोळ केल्याचा आरोप होत आहे. सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञात संशयितांनी चार दुचाकींना आग लावली. घटनेची माहिती समजताच रहिवासी पार्किंगमध्ये आले, मात्र तोपर्यंत दुचाकींनी पेट घेतला होता. काही वेळाने रहिवाशांनी आग विझवली. या जाळपोळीत विजय भामरे, रवींद्र यांची एमएच 15 एफके 9415 क्रमांकाची नवीन प्लॅटिना, सुरेश मोरे यांची एमएच 15 एक्स 3510, संतोष मोरे यांची एमएच 15 डीडी 0110, आणि शारदा बुरकुल यांची एमएच 15 डीक्यू 9422 क्रमांकाची दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच, अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मध्यरात्री अज्ञात संशयितांनी याच इमारतीच्या  पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली होती. काही दुचाक्यांचे आरसे व सीट चोरीला गेले होते. त्यावेळीही म्हसरूळ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपासाचे आश्‍वासन दिले होते. मात्र पोलिसांनी ठोस तपास न केल्याने त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला. परिसरात गस्त देखील होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.